ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात सध्या ७२ वी ऍशेस मालिका (Ashes Series) सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर होत आहे. हा सामना सुरू असतानाच शनिवारी (१८ डिसेंबर) इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. आधीच संघर्ष करत असलेल्या इंग्लंड संघाला आता ब्रिस्बेन येथे झालेल्या पहिल्या ऍशेस सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ३ गुणांचे नुकसान झाले आहे.
खरंतर आयसीसीने यापूर्वीच ब्रिस्बेन कसोटीत (Brisbane Test) षटकांची गती कमी राखल्याबद्दल (Slow Over Rate) इंग्लंडचे जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेतील (ICC World Test Championship) ५ गुण कमी केले होते आणि १०० टक्के सामना शुल्क रद्द केले होते. मात्र, आता शनिवारी आयसीसीने आणखी ३ गुण इंग्लंडचे कमी केले आहेत.
आयसीसीच्या नियमानुसार एका षटकाची गती कमी राखल्यास १ गुण कमी होतो. त्यानुसार आता असे लक्षत आले आहे की, इंग्लंडने ब्रिस्बेन कसोटीत ५ नाही, तर ८ षटकांची गती कमी राखली होती. ज्यामुळे त्यांना ८ गुणांचा फटका बसला आहे. इंग्लंडने यापूर्वीही भारताविरुद्ध खेळताना याच कारणामुळे २ गुण गमावलेले आहे.
त्यामुळे आत्तापर्यंत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १६ गुण मिळवूनही १० गुण कमी झाल्याने इंग्लंडचे ६ गुणच राहिले आहेत. त्यांच्या विजयाच्या टक्केवारीवर देखील याचा परिणाम झाला असून आता इंग्लंड संघ गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर घसरले आहेत.
गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर श्रीलंका आहे, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. खरंतर भारताचे सर्वाधिक गुण आहेत, मात्र गुणतालिकेत विजयाच्या टक्केवारीनुसार क्रमवारी ठरत असल्याने भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अव्वल स्थानी असलेल्या श्रीलंकेची टक्केवारी १०० टक्के असून ऑस्ट्रेलियाची देखील १०० टक्के आहे. पाकिस्तानची टक्केवारी ७५ आहे, तर भारताची ५८.३३ टक्के आहे. सातव्या क्रमांकांवर घसरलेल्या इंग्लंडची १० टक्के आहे.
दुसऱ्या कसोटीतही इंग्लंड पिछाडीवर
दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघ संघर्ष करताना दिसत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव १५०.४ षटकांनंतर ९ बाद ४७३ धावांवर घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने २ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडची अवस्था दुसऱ्या दिवसाखेर २ बाद १७ धावा अशी झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
थरारक! ऍडलेड कसोटीदरम्यान वीजांचा कडकडाट, पंचासह खेळाडूही घाबरले
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ‘किंग कोहली’ची बॅट तळपणार? पाहा यापूर्वीची आकडेवारी
गांगुली म्हणतोय, ‘पदार्पणात चांगली कामगिरी असली, तरी श्रेयस अय्यरची खरी परिक्षा…’