मुंबई । साऊथम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात जो रुटच्या गैरहजेरीत बेन स्टोक्स हा संघाचे नेतृत्व सांभाळत होता. नेतृत्व करत असलेल्या पहिल्या सामन्यात त्याला चुणूक दाखवता आली नाही. या पराभवामुळे बेन स्टोक्सच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासामध्ये संघाचे नेतृत्व सांभाळणारा बेस्ट हा 81 वा खेळाडू होता. नेतृत्व करत असलेल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागणारा हा दुसरा कर्णधार बनला आहे. यापूर्वी इंग्लंडचा दिग्गज खेळाडू माजी कर्णधार मायकल वॉन यांच्या नावावर हा विक्रम होता. मायकल वॉन याने 2003 साली संघाचे नेतृत्व सांभाळले होते. नेतृत्व करत असताना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
वेस्ट इंडिजने इंग्लंडला पहिल्या सामन्यात चार गडी राखून पराभव करत इतिहास घडवला. कोरोना व्हायरसच्या नंतर कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवणारा वेस्ट इंडिज हा पहिला संघ बनला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांनी पहिल्या डावात 204 धावा तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने 318 धावा करत इंग्लंडवर 114 धावांची आघाडी मिळवली होती. इंग्लंडने दुसऱ्या डावात 313 धावा करत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य दिले. वेस्ट इंडीजने हे आव्हान सहा गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. या विजयासह वेस्ट इंडिजने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे.