कोरोना महामारीमुळे अनेक बंधनांसह सुरू झालेले क्रीडाविश्व नव्या वर्षातही त्याच बंधनात पार पडतेय. या बंधनांमुळे ५ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या भारत दौऱ्यापूर्वी इंग्लंडच्या क्रिकेट संघाला एका नवीन समस्येला सामोरे जावे लागेल. या अतिमहत्त्वाच्या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला सरावासाठी अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर भारतात दाखल होईल.
इंग्लंड संघाला व्हावे लागणार क्वारंटाईन
इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर इंग्लंड संघ २७ जानेवारी रोजी चेन्नई येथे पोहोचेल. ५ फेब्रुवारीपासून भारत-इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरुवात होईल. तत्पूर्वी, इंग्लंडच्या संघाला सहा दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे, इंग्लंडच्या खेळाडूंना मालिकेपूर्वी सरावासाठी अवघे तीन दिवस मिळू शकतात.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघाचा भाग नसलेले जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व रॉरी बर्न्स हे खेळाडू रविवारी (२४ जानेवारी) रात्री चेन्नईत दाखल झाले आहेत. मालिकेपूर्वी पाच दिवस आधी हे तिन्ही खेळाडू इंग्लड संघाच्या ‘बायो-बबल’ मध्ये प्रवेश करतील. इंग्लंड संघाला श्रीलंकेमध्ये मालिकेआधी अवघे ४८ तास सरावासाठी मिळाले होते. इंग्लंडचा प्रमुख अष्टपैलू मोईन अली श्रीलंकेत पोहोचल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.
भारतात होतेय पहिली मालिका
सन २०२० मध्ये कोरोना या आजारामुळे भारतात क्रीडासामने आयोजित केले जात नव्हते. जगप्रसिद्ध टी२० स्पर्धा आयपीएल देखील युएई येथे पार पडली होती. इंग्लंडविरूद्धची आगामी मालिका कोरोना महामारीनंतर भारतात आयोजित करण्यात आलेली पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका असेल. यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही देशांतर्गत टी२० स्पर्धा २०२१ सालाच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे.
बंद दाराआड खेळवला जाणार दौरा
इंग्लंड संघ भारताविरुद्ध चार कसोटी, तीन वनडे व पाच टी२० सामने खेळणार आहे. पहिल्या दोन कसोटी चेन्नई येथे तर उर्वरित दोन कसोटी अहमदाबाद येथे खेळल्या जातील. वनडे व टी२० सामन्यांचे यजमानपद अनुक्रमे पुणे व अहमदाबाद यांना लाभले. हा संपूर्ण दौरा बंद दाराआड खेळविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून मर्यादीत संख्येने प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाईल, अशा स्वरूपाची चर्चा माध्यमांत आहे.
महत्वाच्या बातम्या:
बेअरस्टोने केली जादू! चालू सामन्यात लाल चेंडूला बनवले पांढरे
एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ही विक्रमी कामगिरी