इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन कसोटी सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन केले होते. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाने जोरदार पुनरागमन केले आणि विजय मिळवत मालिकेत १-१ ने बरोबरी केली. इंग्लंडने भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत केले. ज्यामुळे भारतीय संघाच्या नावे एक नको असलेला विक्रम प्रस्थापित झाला.
या पराभवासह भारतीय संघाने सर्वाधिक वेळा एका डावाने पराभूत होणाऱ्या संघांमध्ये ऑस्ट्रेलियाला पछाडले आहे. यामुळे भारतीय संघ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला. एका डावाने सर्वाधिक वेळा पराभूत होण्याचा विक्रम यजमान इंग्लंड संघाच्याच नावे आहे. इंग्लंड आतापर्यंत एकूण ६३ सामन्यांमध्ये एका डावाने पराभूत झाला आहे.
त्यानंतर वेस्ट इंडिज संघ ४७ वेळा एका डावाने पराभूत झाला आहे. तर भारतीय संघ ४५ वेळा एका डावाने पराभूत झाला आहे. त्यामुळे या यादीत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर ४४ पराभवासह ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेश ४३ आणि न्यूझीलंड ३९ सामन्यांमध्ये एका डावाने पराभूत झाला आहे.
दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने केवळ ७८ धावा केल्या. ज्याच्या बदल्यात इंग्लंडने जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर ४३२ धावांचा डोंगर उभा केला होता. ज्यामुळे इंग्लंडला ३५४ धावांची आघाडी देखील मिळाली होती.
नंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज रोहित शर्मा(५९), चेतेश्वर पुजारा(९१) आणि विराट कोहली(५५) यांनी अर्धशतके करत भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चौथ्या दिवशी इंग्लिश गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. ज्यामुळे एकही भारतीय फलंदाज इंग्लिश गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. त्यामुळे भारतीय संघाचा डाव केवळ २७८ धावांत गुंडाळला गेला. तसेच इंग्लंडने भारतीय संघावर एक डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर क्रेग ओव्हर्टनने ३ विकेट घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
–विराटच्या नव्या साथीदाराचा सीपीएलमध्ये पदार्पणातच जलवा, २०० च्या स्ट्राईकरेटने केली अर्धशतकी खेळी
–डीआरएसने केला पुजाराचा घात, अवघ्या ९ धावांनी हुकलं कसोटी शतक, पाहा व्हिडिओ
–बिग ब्रेकिंग! पराभवानंतर भारताचा प्रमुख खेळाडू झाला दवाखान्यात दाखल