भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघादरम्यान सध्या पाच टी२० सामन्यांची मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ईओन मॉर्गनच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली.
भारताविरुद्धचा आजचा सामना मॉर्गनच्या टी२० कारकिर्दीतील एकूण शंभरावा सामना ठरला. हा टप्पा गाठणारा तो पहिलाच इंग्लिश खेळाडू ठरला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील असे करणारा चौथा खेळाडू ठरला.
रोहित शर्मा-शोएब मलिकच्या पंक्तीत स्थान
ईओन मॉर्गन आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतर तीन खेळाडूंनी १०० टी२० सामने खेळण्याचा कारनामा केला आहे. पाकिस्तानच्या शोएब मलिकने सर्वात पहिल्यांदा १०० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. त्याने आजवर ११६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्माने १०० टी२० सामन्यांचा टप्पा गाठला होता.
रोहितने आजवर १०९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने ही कामगिरी केली होती. त्याने आजवर १०२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. या तिघांनंतर आता ईओन मॉर्गनने शंभरावा सामना खेळण्याचा कारनामा केला आहे.
१०० किंवा अधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारे खेळाडू-
१) शोएब मलिक २) रोहित शर्मा ३) रॉस टेलर ४) ईओन मॉर्गन*
दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंडची टी२० मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतील.
महत्वाच्या बातम्या:
पूनम राऊतची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, अव्वल २० फलंदाजांमध्ये मिळवले स्थान
डिलिट करा ते! आयसीसीने शेअर केलेल्या एमएस मलिंगा फोटोवर चाहते भडकले





