न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) निलंबित केले आहे. सन २०१२ मध्ये रॉबिन्सनने सोशल मीडियावर लैंगिकता आणि वर्णद्वेषाबद्दल टिप्पण्या केलेल्या, ज्याचे स्क्रीनशॉट त्याच्या पदार्पणानंतर व्हायरल झाले आणि मंडळाने त्याला चौकशी पूर्ण होईपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले. याच प्रकरणाचा संदर्भ घेत भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू फारूख इंजिनीयर यांनी इंग्लिश खेळाडूंविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
इंग्लिश खेळाडू भारतीयांचे तळवे चाटतात
ओली रॉबिन्सन प्रकरण ताजे असतानाच भारताचे माजी क्रिकेटपटू व सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक असलेले फारूख इंजिनीयर यांनी इंग्लिश खेळाडू व तेथील नागरिकांविषयी अत्यंत गंभीर विधान केले आहे.
ते म्हणाले, “इंग्लंडमधील खेळाडू आणि काही नागरिक अत्यंत वर्णद्वेषी आहेत. मात्र, आयपीएलमुळे या सर्वांचा दृष्टीकोन बदलला आहे. केवळ पैसे मिळवण्यासाठी ते आपले तळवे चाटतात. परंतु, पूर्वी या लोकांचे रंग काय होते ते माझ्यासारख्यांना माहित आहे. हे लोक भारतात क्रिकेट खेळण्यासाठी, प्रशिक्षक म्हणून किंवा समालोचक म्हणून येतात आणि पैसे कमावतात.”
ईसीबी सुरुवातीला आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होऊ देत नसत. परंतु, २०११ नंतर मोठ्या प्रमाणात इंग्लिश क्रिकेटपटू आयपीएलमधून दिसू लागले आहेत.
मला देखील तसे अनुभव आले
आपल्या जमान्यातील प्रमुख भारतीय यष्टीरक्षक असलेल्या फारूख इंजिनीयर यांनी आपण कशाप्रकारे वर्णद्वेषाला सामोरे गेलो, याबाबत सांगताना ते म्हणाले, “ज्यावेळी मी प्रथम इंग्लंडमध्ये लँकेशायरसाठी काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी आलो त्यावेळी अनेक जण माझ्यासमोर वांशिक टिप्पण्या करत. मी भारतातून आल्यामुळे मला लक्ष केले जात. परंतु, मी माझ्या खेळाने त्यांना प्रत्युत्तर देत देशाचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न केला.” यापूर्वी देखील अनेक भारतीय क्रिकेटपटूंना इंग्लंडमध्ये वंशवादाचा सामना करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान
फाफ डू प्लेसिसच्या शरिरावरील टॅट्यूमागील रहस्य माहित आहेत का? नसेल तर घ्या जाणून