क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी त्यांच्या आक्रमकतेच्या जोरावर आपली ओळख बनवली आहे. या खेळाडूंनी विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही आपली आक्रमकता कधी सोडली नाही. आज या लेखात विश्वचषक इतिहासातील अशाच एका खेळाडूबद्दल जाणून घेऊ, ज्याने आपल्या 25 चेंडूच्या खेळीत तब्बल 15 चौकार लगावले होते. सुरवातीच्या 25 चेंडूंचा सामना करताना 15 चौकार लगावणारा हा विश्वचषक इतिहासातील एकमेव फलंदाज आहे. तो खेळाडू म्हणजे ब्रेंडन मॅक्यूलम.
न्युझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमने विश्वचषक स्पर्धेत खेळताना 25 चेंडूच्या खेळीमध्ये तब्बल 15 चौकार मारले होते. त्याने ही शानदार कामगिरी 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत केली होती. 20 फेब्रुवारी 2015 ला वेलिंग्टनच्या मैदानावर एक साखळी सामना न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये झाला होता.
25 चेंडूच्या खेळीमध्ये 8 चौकार आणि 7 षटकार
या सामन्यात इंग्लंडचा संघ न्युझीलंडचा गोलंदाज टीम साउथीच्या घातक गोलंदाजीसमोर फक्त 123 धावांवर ढेपाळला. त्यानंतर त्यालक्ष्याचा पाठलाग करताना न्युझीलंड संघाचा कर्णधार मॅक्यूलमने 25 चेंडूवर 77 धावांची तुफानी खेळी करीत न्युझीलंडला 12.2 षटकांत विजय मिळवून दिला होता. न्युझीलंडच्या मॅक्युलमने या खेळीदरम्यान 8 चौकार आणि 7 षटकार टोलवले होते आणि तेही 308 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने.
अनेक जबरदस्त विक्रम आहेत मॅक्युलमच्या नावावर:
मॅक्यूलमने या सामन्यात फक्त 18 चेंडूवर अर्धशतक झळकावले होते, जे विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक आहे. सगळ्यात जलद कसोटी शतकाचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतांना फक्त 54 चेंडूत त्याने शतक केले होते. हा सामना त्याचा कसोटी कारकिर्दीचा अखेरचा सामना होता. तसेच न्युझीलंड संघासाठी सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. 2014 साली भारताविरुद्ध खेळताना वेलिंग्टनच्या मैदानावर खेळतांना 559 चेंडूंवर 302 धावांची जबरदस्त खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने 32 चौकार आणि 4 षटकार लगावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
राशिदचा आबुधाबीत जलवा; सामन्यात ५ विकेट्स घेत सलग दुसऱ्यांदा जिंकला सामनावीर पुरस्कार
सचिन तेंडुलकरने कधीही केली नाही दारुची जाहीरात; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक
हा खेळ आकड्यांचा! ‘हा’ भारतीय गोलंदाज नेहमीच ठरतो न्यूझीलंडला त्रासदायक