सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ३३८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून या डावात स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी केली आहे. यासह त्याने एक विक्रम केला आहे.
स्मिथने २२६ चेंडूत १६ चौकारांसह १३१ धावांची शतकी खेळी केली. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील २७ वी शतकी खेळी आहे. स्मिथने त्याच्या कारकिर्दीतील १३६ व्या कसोटी डावात खेळताना हे २७ वे शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे तो कसोटीत सर्वात जलद २७ शतकं करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. याबरोबरच त्याने भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना या यादीत मागे टाकले आहे.
कसोटीत सर्वात जलद २७ शतके करण्याचा विश्वविक्रम महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. आता त्यांच्या पाठोपाठ या यादीत स्मिथचे नाव सामील झाले आहे. तसेच या यादीत ब्रॅडमन आणि स्मिथ पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर सचिन आणि विराट संयुक्तरित्या विराजमान आहेत. या दोघांनीही त्यांच्या १४१ व्या कसोटी डावात २७ वे शतक झळकावले होते.
सर्वात जलद २७ कसोटी शतकं करणारे फलंदाज –
७० डाव – डॉन ब्रॅडमन
१३६ डाव – स्टिव्ह स्मिथ
१४१ डाव – विराट कोहली
१४१ डाव – सचिन तेंडुलकर
स्मिथची भारताविरुद्ध ८ शतकं –
स्मिथचे सिडनी कसोटीत केलेले भारताविरुद्धचे ८ वे कसोटी शतक आहे. त्यामुळे त्याने भारताविरुद्ध सर्वाधिक शतकं करण्याच्या रिकी पाँटिंग, गॅरी सोबर्स आणि विवियन रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या तिघांनीही भारताविरुद्ध प्रत्येकी ८ कसोटी शतके केली आहेत.
स्मिथने भारतीय संघाविरुद्ध कसोटीत केलेली शतके-
नाबाद १६२ धावा- ऍडलेड
१३३ धावा- ब्रिस्बेन
१९२ धावा- मेलबर्न
११७ धावा- सिडनी
१०९ धावा- पुणे
नाबाद १७८ धावा- रांची
१११ धावा- धरमशाला
१३१ धावा- सिडनी
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध स्मिथची आठवी कसोटी सेंचूरी, ‘इतक्या’ डावात केलाय हा पराक्रम
भारताविरुद्ध स्मिथचा बोलबाला! गेल्या ५ वर्षात केलीत ४ शतके
आखाडा पुन्हा गाजणार! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनास राज्य शासनाची परवानगी