हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल)चे मागील दोन पर्व हे बंद दरवाजाआड खेळवण्यात आली आणि त्यामुळे एफसी गोवाचे चाहत्यांना आपल्या संघाला चिअर करता आले नाही. पण, दोन वर्षांनंतर प्रेक्षकांसाठी स्टेडियमची दारं उघडली गेली आणि आता फतोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं दिसतंय. चाहत्यांचे पुनरागमन हे आयएसएल हंगामातील एफसी गोवाच्या दमदार कामगिरीसाठी महत्त्वाचे ठरले आहे.
एफसी गोवाचे दोन फॅन क्लब आहेत, पहिला एफसी गोवा फॅन क्लब आणि दुसरा दी ईस्ट लोवर आर्मी… या दोन्ही क्लब्सना कोरोना काळातील बायो बबल नियमांमुळे दोन वर्ष स्टेडियमवर येता आले नाही. एफसी गोवाला समर्थनासाठी हे क्लब कार रॅली काढतात आणि संघाच्या बसला सुरक्षा पुरवतात, इतकेच नाही तर संघाच्या सराव सत्रातही खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी हे हजर असतात. आता प्रेक्षकांचे पुनरागमन झाले आहे आणि ही गोष्ट समीर शिरोडकरला सुखावणारी आहे. समीर शिरोडकर हा एफसी गोवा विश्वासू आणि दी ईस्ट लोवर आर्मी क्लबचा सदस्य आहे.
”जणू लाईफलाईनच परतली आहे,”असे समीर सांगतो. ”आयएसएल गोव्यात होत होती आणि आम्ही ती पाहू शकलो नाही, हे आमच्यासाठी खरोखरच हृदयद्रावक होते. पण, झालं ते झालं… आता आम्ही पूर्वीप्रमाणेच स्टँडवर परत येत आहोत आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत आहोत. घरच्या मैदानावरील एफसी गोवाचा रेकॉर्ड तुम्ही पाहू शकता. आम्ही दोन्ही होम गेम्समध्ये क्लीन शीट ठेवली आहे आणि दोन्ही सामने आरामात जिंकले आहेत.”
समीरसारखे अनेक स्थानिक फॅन्स प्रत्येक पर्वात स्टँड्सवर येत आहेत आणि त्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे एफसी गोवाने येथील स्थानिकांशी जोडलेली नाळ… भारतातील अनेक फुटबॉल चाहत्यांप्रमाणे हिरो आयएसएल सुरू होण्यापूर्वी समीरही युरोपियन क्लबशी जोडला गेला होता. आयएसएलमुळे या सर्व प्रेक्षकांना त्यांचा हक्काचा क्लब मिळाला आणि त्यांना चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये येण्याचं निमित्त मिळालं.
”एफसी गोवा क्लबमुळे काय झालं, तर येथील चाहत्यांना हक्काचा स्थानिक संघ मिळाला. सुरुवातीला हे आम्ही सर्व मिस करत होतो आणि ही उणीव एफसी गोवा क्लबने भरून काढली. क्लबला चिअर करताना सर्वकाही स्थानिकांशी निगडीत असावं, हे आमचे प्रमुख्य ध्येय आहे. तरच आणखी चाहते जोडले जातील. तुम्ही स्थानिक भाषेत जयघोष केल्याने काय होतं, की आणखी प्रेक्षक आमच्या सूरात सूर मिसळतात, आमच्याशी जोडले जातात. हाच आमचा प्रयत्न आहे. गोव्यातील विविध भागातून येणारे लोकं आमच्यासोबत आहेत,”असे समीर सांगतो.
एफसी गोवा क्लबप्रती प्रेम हे केवळ घरच्या मैदानांपुरते मर्यादित नाही, तर क्लबच्या अवे ( प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर) सामन्यांसाठी इस्ट लोवर आर्मी हजर राहते. हे भारतीय फुटबॉलबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. हिरो आयएसएल आणि त्याच्या होम-अवे फॅन संस्कृतीमुळे भारतीय फुटबॉलकडे बरेच स्थानिक चाहते आकर्षित होत आहेत, असे समीर म्हणतो.
समीर म्हणतो, “आयएसएल खरोखरच महत्त्वाचे आहे. केवळ फुटबॉलच्या बाबतीतच नाही, तर भारतभर फुटबॉलबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. आयएसएल हे एक नवे व्यासपीठ बनले आहे आणि इथे फुटबॉल खेळले जाते, याची जाण करणारे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील फुटबॉलला यामुळे खूप मदत झाली आहे.”
विशेष म्हणजे एफसी गोवाचे चाहते स्वतःची एक वेगळी ओळख घेऊन येतात. गोव्याच्या संस्कृतीतून चाहत्यांनी एक गोष्ट अंगिकारली आणि ती म्हणजे सुसेगडची ( Susegad) कल्पना, याचा अर्थ आरामशीर किंवा आशयघन असणे. “लोकांना आरामशीर बसून खेळाचा आनंद घ्यायचा आहे. पण काहीही झाले तरी ते संघासोबत असतील. हे लोक सुसेगड असले तरी ते नेहमी संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. आम्ही जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे समीर सांगतो.
एफसी गोवाने आयएसएलच्या नवीन मोसमाची चांगली सुरुवात केली आहे आणि सध्या ते तालिकेत तिसर्या स्थानावर आहेत. समीरसारख्या बहुतेक चाहत्यांना हा मोसम क्लबसाठी पुनर्बांधणीचा असेल अशी अपेक्षा होती, परंतु नवीन मुख्य प्रशिक्षक आणि एफसी गोवाचे माजी खेळाडू कार्लोस पेना यांनी स्वीकारलेल्या धाडसी शैलीमुळे ते प्रभावित झाले आहेत. एफसी गोवाचा संघ २६ नोव्हेंबरला बंगळुरू एफसीविरुद्ध खेळणार आहे. तालिकेत आगेकूच करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ईस्ट लोवर आर्मीही त्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एफसी गोवाची गाडी सूसाट; सलग चार पराभव पत्करणाऱ्या बंगळुरू एफसीला देणार टक्कर
“त्यादिवशी द्रविडने धोनीला खडसावले आणि फिनीशरचा जन्म झाला”