---Advertisement---

शतकी खेळीबरोबर मयंक अगरवालने घातली ‘या’ विक्रमाला गवसणी!

On: शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2019 1:19 PM
---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश संघात गुरुवारपासून पहिला कसोटी सामना होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आज भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने शतकी खेळी केली आहे.

त्याने 183 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने त्याचे हे शतक पूर्ण केले. अगरवालचे हे कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. हे शतक त्याने 12 व्या कसोटी डावात पूर्ण केले आहे. त्यामुळे तो सलामीवीर म्हणून सर्वात जलद तिसरे कसोटी शतक करणारा चौथ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे.

तसेच त्याने या यादीत भारताचे माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट यांची बरोबरी केली आहे. मर्चंट यांनीही 12 कसोटी डावातच सलामीवीर म्हणून तिसरे कसोटी शतक केले होते.

या यादीत अव्वल क्रमांकावर अगरवालचा सलामीवीर सहकारी रोहित शर्मा आहे. रोहितने त्याच्या कारकिर्दीतील सलामीवीर म्हणून पहिली तीन कसोटी शतके 4 डावात पूर्ण केली होती. तर दिग्गज माजी फलंदाज सुनिल गावस्कर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी सलामीवीर म्हणून पहिली तीन कसोटी शतके करण्यासाठी 7 डाव घेतले होते.

सध्या सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने पहिल्या डावात 200 धावांचा टप्पा पार केला आहे. भारताकडून मयंक अगरवाल व्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली केली आहे. पुजारा 54 धावांवर बाद झाला. तर रहाणे सध्या नाबाद आहे.

या डावात अगरवाल आणि पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारीही केली आहे.

तत्पूर्वी या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद 150 धावा केल्या आहेत.

सलामीवीर म्हणून सर्वात जलद पहिले तीन कसोटी शतके करणारे भारतीय फलंदाज –

4 डाव – रोहित शर्मा

7 डाव – सुनिल गावस्कर

9 डाव – केएल राहुल

12 डाव – विजय मर्चंट/मयंक अगरवाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---