चेन्नई- बुद्धिबळाच्या मूळ देशात म्हणजेच भारतात पुढील महिनाअखेरीस होणार्या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या निमित्ताने भारतभरात आगळ्यावेगळ्या अशा ऑलिम्पिकत क्रीडाज्योतीच्या दौडीचे आयोजन जागतिक बुद्धिबळ महासंघ आणि भारतीय बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
चेन्नईनजीकच्या महाबलीपुरम येथे येत्या 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत 44व्या चेस ऑलिम्पियाडचे योजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील खुल्या गटात विक्रमी 343 संघांनी सहभाग नोंदविला असून महिला गटात 185 संघांचा सहभाग आहे.
बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला होता. त्यामुळे भारताच्या सन्मानार्थ क्रीडाज्योतीच्या दौडीचा प्रारंभ भारतातच करण्यात येऊन त्यानंतर ही ज्योत सर्व खंडांमध्ये प्रवास करणार असल्याचे फिडेने याआधी जाहीर केले होते. परंतु वेळेअभावी या वेळी ही ज्योत केवळ भारतातील विविध ठिकाणी प्रवास करणार आहे.
या चेस ऑलिम्पियाडच्या निमित्ताने जगभरात बुद्धिबळाची लोकप्रियता वाढावी व या खेळाचा प्रसार व्हावा, अशी योजना आम्ही आखली होती. त्यानुसार फिडेचे सदस्य असलेल्या सर्व ेदशांमध्ये क्रीडाज्योतीचा प्रवास होणार होता. परंतु ही योजना आता बदलण्यात आली आहे, असे फिडचे अध्यक्ष अर्काडी व्होर्कोविच यांनी जाहीर केले.
चेस ऑलिम्पियाडच्या सुमारे 100 वर्षांच्या इतिहासात ही स्पर्धा पहिल्यांदाच भारतात होणार असून या संयोजनामुळे बुद्धिबळ विश्वात भारताची प्रतिष्ठा आणखीनच उंचावणार आहे. भारताचा हा मोठाच सन्मान असल्याचे सांगून चेस ऑलिम्पियाडच्याचे संचालक भारत चौहान म्हणाले, की ऑलिम्पिकसाठी जे अथेैन्सचे स्थान आहे, तेच यापुढे बुद्धिबळासाठी भारताचे असेल. चेस ऑलिम्पियाडचे भारतात आयोजन व्हावे, हे आमचे स्वप्न होते आणि आता त्याची पूर्तता होणे ही प्रतिष्ठेची बाब आहे.
चेस ऑलिम्पियाडच्या क्रीडाज्योतीच्या दौडीसाठी मार्ग, तारखा, वेळापत्रक व अन्य सर्व बाबींची घोषणा केंद्र शासन, जागतिक बुद्धिबळ महासंघ आणि अन्य गुंतवणूकदार यांच्याशी चर्चा करून केली जाईल, असेही चौहान यांनी सांगितले.
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संजय कपूर म्हणाले, की चेस ऑलिम्पियाडच्या आयोजनाची आव्हानात्मक जबाबदारी आमच्यावर सोपविल्याबद्दल मी फिडेचा आभारी आहे. या स्पर्धेमुळे भारतातील उदयोन्मुख आणि गुणवान बुद्धिबळपटूंना निश्चितच प्रेरणा मिळेल आणि त्यांना जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याचीही संधी मिळेल. आम्ही या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेऊ.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरू होण्यापूर्वी क्रिकेटचा ‘हा’ नियम बदलला
रेल्वेत ‘गँगमन’ ते आयपीएल टीम्सचा ‘लकी चार्म’, वाचा एका दिवसात करोडपती बनलेल्या कर्णबद्दल
INDvsSA। पहिल्या सामन्यासाठी रिषभ पंत देऊ शकतो ‘या’ खेळाडूंना संधी