आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यावेळी एखाद्या संघात दिग्गज गोलंदाज नसेल, तर कुणाकडे स्टार फलंदाज नसतील. पण तरीही सर्वांच्या नजरा आयपीएलच्या जेतेपदावर राहतील. खरंतर कोरोनामुळे आयपीएल २०२१ चा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करावा लागला होता, पण त्यात अनेक संस्मरणीय सामने आणि जबरदस्त कामगिकी खेळाडूंनी आणि संघांनी केली होती.
रवींद्र जडेजाने हर्षल पटेलच्या एका षटकात ३७ धावा ठोकलेल्या असो किंवा दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने सलग ६ चेंडूत ६ चौकार मारणे असो. लीगच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या २९ सामन्यांशी संबंधित अशा ५ अविस्मरणीय क्षणांविषयी आपन जाणून घेणार आहोत.
जडेजाच्या एकाच षटकात ३७ धावा
आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएल २०२१ मधील पहिल्या ४ सामन्यांमध्ये ५.८५ च्या इकॉनॉमी रेटने डेथ ओव्हरमध्ये ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामना आला. हा सामना त्याच्यासाठी खरोखरच खूप वाईट ठरला. या सामन्यात हर्षलने सीएसकेकडून डावाचे २० वे षटक टाकले. याच जडेजाने पहिल्या ४ चेंडूत ४ षटकार ठोकले, ज्यामध्ये एका नो बॉलचा देखील समावेश होता.
जडेजाने पुढच्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि पुढच्या २ चेंडूत जडेजाने एक षटकार आणि एक चौकार मारला. अशाप्रकारे जडेजाने हर्षलच्या एका षटकात एकूण ३७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हे दुसरे महागडे षटक ठरले.
पृथ्वी शॉचे पहिल्याच षटकातील ६ चेंडूत सलग ६ चौकार
दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ हा जडेजापेक्षा एक पाऊल पुढे गेला आणि त्याने पहिल्या षटकातील ६ चेंडूत सलग ६ चौकार ठोकले. शॉने हे कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज शिवम मावीच्या षटकात हा पराक्रम केला. या सामन्यात कोलकाताने दिल्लीला १५५ धावांचे लक्ष्य दिले होते. जे टी -२० च्या दृष्टीने मोठे नव्हते. पण शॉने पहिल्याच षटकात अशी फलंदाजी केल्याने, हे लक्ष्य दिल्लीसाठी खूपच छोटे असल्याचे सिद्ध झाले. त्याने शिखर धवनसोबत पहिल्या विकेटसाठी १३२ धावा जोडल्या आणि दिल्लीने २१ चेंडू आणि ७ गडी राखून हा सामना जिंकला.
संजू सॅमसनचे शतक आणि ऐनवेळी ‘न’ घेतलेली धाव
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएल २०२१ चे पहिले शतक झळकावले होते. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध शतक झळकावले. मात्र, या सामन्यात त्याच्या शतकापेक्षा जास्त त्याने अखेरीस धाव न घेतल्याची चर्चा जास्त झाली.
पंजाब किंग्सने राजस्थानला २२२ धावांचे लक्ष्य दिले होते. राजस्थान या लक्ष्याच्या अगदी जवळ आले होते. त्यांना शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या २ चेंडूत ५ धावांची गरज होती. तेव्हा सॅमसन स्ट्राईकवर होता, त्याने पाचवा चेंडू लाँग ऑफच्या दिशेने मारला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस नॉन स्ट्रायकरला उभा होता, ज्याला राजस्थानने या वेळच्या लिलावात १६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण सॅमसनने एकेरी धाव घेण्यास नकार दिला.
यानंतर मॉरिसला त्याच्या क्रीजवर परतावे लागले. राजस्थानला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती. अर्शदीपने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. सॅमसनने मोठा फटका मारला. चेंडू हवेत गेला आणि तो बाद झाला आणि राजस्थानने हा सामना गमावला.
ब्रारने केले कोहली, मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्सला ७ चेंडूत बाद
पंजाब किंग्जचा फिरकीपटू हरप्रीत ब्रारने आयपीएल २०२१ मध्ये जे केले ते दीर्घकाळ लक्षात राहील. आयपीएलचा तिसरा हंगाम खेळताना या गोलंदाजाच्या नावावर एकही विकेट नव्हती. पण आयपीएल २०२१ च्या २६ व्या सामन्यात आरसीबी विरुद्ध या गोलंदाजाने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गज फलंदाजांना अवघ्या ७ चेंडूत बाद करत संघाचा विजय निश्चित केला होता.
पोलार्डची सीएसके विरुद्ध धडाकेबाज फलंदाजी
आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कॅरन पोलार्ड सीएसके विरुद्ध अशी खेळी खेळला, जो दीर्घकाळ लक्षात राहील. सीएसकेने मुंबईला २१९ धावांचे लक्ष्य दिले होते. दहाव्या षटकात जेव्हा पोलार्ड फलंदाजीसाठी आला तेव्हा मुंबईची धावसंख्या ३ गडी गमावून ८१ धावा होती. संघाला जिंकण्यासाठी प्रति षटकाला १३ धावा कराव्या लागणार होत्या. त्यानंतर पोलार्डने आक्रमक खेळ केला आणि धावांचा पाऊस पाडला. प्रथम त्याने जडेजाच्या षटकात ३ षटकार आणि नंतर लुंगी एन्गिडीच्या षटकात २ षटकार ठोकले.
शेवटच्या षटकात मुंबईला १६ धावांची गरज होती. लुंगी एन्गिडी हे षटक टाकत होता. धवल कुलकर्णी नॉन स्ट्रायकरवर उभा होता. त्यामुळे, पोलार्डने सर्व ६ चेंडू खेळण्याचा निर्णय घेतला. मधल्या दोन चेंडूंवर चौकार मारताना त्याने पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर एकही धाव घेतली नाही.
संघाला २ चेंडूत ८ धावांची गरज होती. लुंगी एन्गिडी एक फुलटॉस टाकला, ज्यावर पोलार्डने एक षटकार ठोकला. यानंतर, पोलार्डने शेवटच्या चेंडूवर २ धावा केल्या आणि सामना मुंबईच्या झोळीत टाकला. पोलार्ड ३४ चेंडूत ८७ धावा करत नाबाद राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराट कोहली आणि रवी शास्त्री कसोटी क्रिकेटचे उत्तम समर्थक आणि प्रचारक’, ऑसी दिग्गजाकडून कौतुक
दिल्ली कॅपिटल्सला धक्का! ‘हा’ फिरकीपटू आयपीएल २०२१ मधून पडला बाहेर, सरावादरम्यान झाली दुखापत
बटलरच्या जागी आयपीएलमध्ये खेळणारा खेळाडू आहे जबरदस्त फॉर्ममध्ये, राजस्थानसाठी ठरु शकतो ‘एक्स फॅक्टर’