आयपीएल लीग ही जगातील अव्वल दर्जाची टी20 लीग स्पर्धा मानली जाते. आतापर्यंत जागतिक दर्जाच्या या आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये बऱ्याच खेळाडूंना आपले नाव कमवण्याची संधी मिळाली आहे. यातील अनेक खेळाडूंनी या संधीचा फायदा घेत सर्वांचे लक्ष वेधले. काहींनी राष्ट्रीय संघात स्थानही मिळवले.
पण असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी अशी काही वाईट कृत्ये केली आहेत, ज्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. तर आज आम्ही तुम्हाला अशा पाच खेळाडूंविषयी सांगणार आहोत.
1. एस श्रीसंत
एकेकाळी भारतीय संघातील वेगवान गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग असलेला श्रीसंतला आयपीएल 2013 दरम्यान तुरूंगात टाकण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने श्रीसंतसोबत राजस्थान रॉयल्सचे दोन खेळाडू अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांनाही अटक केली होती.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या तपासणीदरम्यान हे तिन्ही खेळाडू दोषी आढळले होते. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटक झाल्यामुळे श्रीसंतला बीसीसीआयनेही आजीवन बंदी घातली होती. कोर्टाच्या आदेशानंतर आता त्यांची बंदी संपुष्टात आली असली तरी आता भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी जवळजवळ बंदच झाले आहेत.
2. राहुल शर्मा
आयपीएल 2012 दरम्यान, पुणे वॉरियर्स संघातील राहुल शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेन पार्नेल या दोन खेळाडूंना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. पोलिसांनी मुंबईतील हॉटेलमध्ये छापा टाकल्यानंतर या दोन खेळाडूंना अटक केली होती. त्या हॉटेलमध्ये मादक पदार्थांचे सेवन केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या रेव्ह पार्टीत उपस्थित असलेल्या 86 लोकांविरूद्ध 1200 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, या दोन्ही खेळाडूंनी सर्व आरोप फेटाळून लावत स्वत: ला निर्दोष असल्याचे सांगितले होते.
3. ल्यूक पोमरसबॅक
साल 2012 मध्ये अमेरिकन महिलेचे शोषण केल्याच्या आरोपावरून आरसीबीचा परदेशी खेळाडू ल्यूक पोमरसबॅकला अटक करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये अमेरिकन महिलेच्या प्रियकरला मारहाण केल्याचा आरोपही त्याच्यावर होता. दिल्ली कॅपिटल आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर ही घटना घडली होती. या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूविरूद्ध आयपीसीच्या कलम 354, 323, 454 आणि 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
4. तुषार आरोठे
गुजरातकडून 100 प्रथम श्रेणी सामने खेळणारे पहिले क्रिकेटपटू तुषार आरोठे यांना 2019 मध्ये आयपीएलच्या 12 व्या मोसमात सट्टेबाजीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान सट्टेबाजी केल्याप्रकरणी तुषार आरोठे यांच्यासह 18 जणांना बडोदा पोलिसांनी अटक केली होती. नंतर तुषार आरोठे यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणात ते पूर्णपणे निर्दोष असल्याचे त्यांनी म्हटले होते.
5. नयन शाह
महाराष्ट्रातील युवा क्रिकेटपटू नयन शाह याला आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंचे आणि सट्टेबाजीचे रॅकेट असल्याची कानपूर पोलिसांना खबर लागली होती. नयनने खेळपट्टीची माहिती देण्यासाठी 15 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्याच्या मोबाईल फोनवरून मुंबईच्या खेळपट्टीची छायाचित्रे जप्त केली गेली आणि संपूर्ण आयपीएल स्पर्धेसाठी त्याचा करार असल्याचे सांगितले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या –
याला म्हणतात क्रिकेटप्रेम! आयपीएलने नाकारलेला ‘हा’ खेळाडू चाललाय इंग्लंडला काऊंटी खेळायला
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच चेन्नईला बसला फटका, ‘या’ बाबतीत झाले मोठे नुकसान