पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत ९ संघातील १६० खेळाडू पुण्यात दाखल

पुणे । स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशन व पुणे महानगरपालिकेतर्फे पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील ९ संघातून १६० खेळाडू स्पर्धेसाठी पुण्यामध्ये दाखल झाले असून रविवारी पूर्वतयारी व सराव करण्यात आला. दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमी, शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे.

अकलूज, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, मुंबई आणि पुणे अशा विविध भागांतील स्पर्धेक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेत वय वर्षे १० ते १२, १२ ते १४, १४ ते १६, १६ ते २० आणि २१ पासून पुणे अशा पाच गटांमध्ये स्पर्धक सहभागी होतआहेत. अश्वारोहणातील ड्रसाज, शो-जंपिंग, टेंट पेगिंग आणि जिमखाना इव्हेंटस् अशा चार प्रकारांत ही स्पर्धा होणार आहे.

अश्वारोहण स्पर्धाला प्रवेश शुल्क नसून स्पर्धकांची निवास व भोजनाची मोफत सुविधा करण्यात आली आहे. सकाळी ७ ते १० आणि दुपारी ४ ते रात्री ८ यावेळेत स्पर्धा होणार आहेत. यामध्ये पाच गट करण्यात आले आहेत.

विजेत्या संघाला पुणे महापौर चषक प्रदान करण्यात येणार आहे. तर ड्रसाज, शो-जंपिंग, टेंट पेगिंग प्रकारात विजेत्यांना रोख १ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यातील विविध भागांतून स्पर्धक येणार असल्याने अश्वारोहणातील कौशल्य पाहण्याची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे.

स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. अश्वारोहणातील चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण देखील यावेळी होणार आहे.

पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेचे आयोजन स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनचे सेक्रेटरी आणि मुख्य संयोजक गुणेश पुरंदरे व विनायक हळबे यांनी केले आहे. स्पर्धा पाहण्याकरीता प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे.

You might also like