कसोटी क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. कधीकधी लहान वयात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणे खेळाडूसाठी प्रतिकूल ठरू शकते. भारतीय संघात अनेकवेळा दिसून आले आहे की अगदी लहान वयात खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी दिली जाते. मात्र, त्यांच्यामध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही आणि ते लवकरच संघाबाहेर गेले.
तसेत असेही काही खेळाडू होते, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावत लहान वयातच कसोटी पदार्पण केले. अशी काही नावे होती ज्यांनी या प्रकारात पुढे जाऊन देशाला गौरव मिळवून दिला आणि अनेक इतिहासही रचले. चला तर मग माहिती घेऊ कोण आहेत हे तरुण खेळाडू, ज्यांनी भारतासाठी सर्वात कमी वयात कसोटी खेळले.
मनिंदर सिंग
वयाच्या 17 वर्षे 193 दिवसांत भारताकडून मनिंदर सिंह या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले आणि सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्या सामन्यात भारताला एक डाव आणि 86 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. बारा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 35 सामन्यात 88 बळी घेतले. लहान वयात पदार्पण करूनही त्याला फारसे क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. एका डावात त्याने सात विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला होता.
पार्थिव पटेल
17 वर्षे 152 दिवस वय असताना या गुजरातमधून आलेल्या खेळाडूने कसोटी पदार्पण केले. इंग्लंडविरुद्ध पटेलने कसोटी पदार्पण केले. महेंद्रसिंग धोनीच्या आगमनाने पटेल संघातून गायब झाला. नंतर बहुतेक वेळा तो संघाबाहेर राहिला. धोनीनंतर ही जागा वृद्धीमान साहा आणि रिषभ पंतने घेतली. पटेल प्रतिभेने समृद्ध होता, पण दुर्दैवाने ते जास्त काळ संघात राहू शकला नाही.
लक्ष्मण शिवरामकृष्णन
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळ केला आणि आपलं स्थान कसोटी क्रिकेटसाठी पक्कं केलं. त्याने वयाच्या 17 वर्षे 118 दिवसांत पदार्पण केले. तो फक्त 9 कसोटी सामने खेळला. यादरम्यान त्याने 26 विकेट घेतल्या. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते त्यानंतर तो जास्त काळ खेळला नाही.
पियुष चावला
पीयूष चावला हा लेगस्पिनर, 17 वर्षे 75 दिवस वय असताना भारताकडून कसोटी संघात आला. मार्च 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या चावला राष्ट्रीय संघाकडून जास्त खेळू शकला नाही. फक्त तीन कसोटी खेळल्या आहेत आणि सात विकेट्स घेऊन चावला संघातून गायब झाला. हा 31 वर्षीय खेळाडू पुनरागमनासाठी प्रयत्न करत असला, तरी असे करणे कठीण आहे.
सचिन तेंडुलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने पाकिस्तानविरुद्ध 16 वर्षे 205 दिवस वय असताना कसोटी संघात पदार्पण केले. इतक्या लहान वयात भारताकडून खेळणारा तो पहिला खेळाडू आहे. 24 वर्षे खेळलेल्या सचिनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. लहान वयात खेळलेल्या खेळाडूंमध्ये तेंडुलकर हे सर्वात यशस्वी नाव आहे. त्याने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15921 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुर्दैवी! मैदानावर क्रिकेट खेळताना दुखापती झाल्याने निधन झालेले 3 खेळाडू
वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेणारा जगातील एकमेव गोलंदाज