आगामी टी-२० स्पर्धेसाठी नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यादरम्यान भारताचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज रवीचंद्रन अश्विनची तब्बल ४ वर्षांनंतर भारतीय संघात मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी वर्णी लागली आहे. यापूर्वी अश्विनने शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना २०१७ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. अशात अश्विनचे संघात पुनरागमन होण्यामागे भारताचा उपकर्णधार रोहित शर्माचा मोठा हात असल्याचे समजते आहे.
टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, रोहित शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेत अश्विनला भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते. रोहित शर्मानेच अश्विनला संघात पुन्हा आणण्यावर जोर धरला होता. आभासी बैठकीदरम्यान जेव्हा हा विषय निघाला त्यावर कर्णधार विराट कोहलीने देखील सहमती दर्शवली.
अश्विन बराच काळ भारतीय संघातून बाहेर होता. त्यामुळे त्याची निवड होईल यावर कोणी विचार केला नव्हता. मात्र विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
तसेच या आधी भारतीय संघाचे मुख्य नीवडकर्ते चेतन शर्मा यांनी याबाबत बोलताना म्हणाले होते की, “वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त आहे. जेव्हा तुम्ही विश्वचषक स्पर्धेसाठी जाता, तेव्हा तुम्हाला एका ऑफस्पिनर गोलंदाजाची गरज असते. यूएईमधील खेळपट्ट्यांवर फिरकीपटू गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे ऑफ स्पिनर गोलंदाजाचे असणे हे संघासाठी महत्त्वाचे ठरते.”
दरम्यान, अश्विन मर्यादित षटकांच्या स्वरूपात भारतीय संघातून खूप काळासाठी बाहेर असला तरीही, तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळतो. तिथे त्याने अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्यामुळे संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी यावरही प्रकाश टाकत म्हणाले, “अश्विनने गेल्या काही काळात आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे तो भारतीय संघात आपली जागा बनवू शकला.”
टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यात अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अनेक युवा खेळाडूंच्या नावे वर्णी लागली आहे. तर असेही काही अनुभवी खेळाडू होते, ज्यांना संघातून डच्चू मिळाला आहे. त्यामध्ये यजुवेंद्र चहल आणि शिखर धवन यांसारख्या खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला यंदा संघाचा मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आले आहे.
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळविण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय संघ ब गटात आहे. ज्यात भारतासोबत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा संघ आहे. तर उर्वरित २ संघ पात्रता फेरीतून निवडले जाणार आहेत. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–धोनीपुढे मोठा पेच, टी२० विश्वचषकात भारताचा मार्गदर्शक बनण्यासाठी सोडावी लागणार सीएसकेची साथ!
–फॉर्मात असूनही टी२० विश्वचषकासाठी लागली नाही पृथ्वी शॉची वर्णी, ‘या’ खेळाडूमुळे भंगले स्वप्न
–टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर, ६ वर्षांनंतर धाकड गोलंदाजाचे पुनरागमन