---Advertisement---

भारतीय क्रिकेटमधील दुर्दैवाचं नाव- पुणेकर वसंत रांजणे, विंडीजविरुद्ध खेळताना रक्ताने माखलेला मोजा

Vasant-Ranjane
---Advertisement---

भारतीय क्रिकेट पहिल्यापासूनच स्पिनर्सवर अवलंबून राहिलेय. अगदी भारताच्या पहिल्या टेस्टपासून आजवर यामध्ये फारसा बदल झाला नाही. सध्या थोडीफार परिस्थिती बदललीये आणि फास्ट बॉलर्स कहर करतायेत. मात्र, भारतात खेळताना नेहमीच स्पिनर्सना अधिकच महत्व दिलं जातं. स्पिनर्सवर जास्त निर्भर राहिल्याचे टीम इंडियाला एक नुकसान सोसावे लागले आहे. ते म्हणजे भारतात बराच मोठा काळ चांगले, इतिहासात नोंद होतील असे फास्ट बॉलर तयार झाले नाहीत. खरंतर याला दुसरी बाजू अशी आहे की, स्पिनर्सना लवकरात लवकर गेममध्ये आणण्यासाठी फक्त फास्ट बॉलर्सचा वापर केला जायचा. फास्ट बॉलर्सनी आपला पहिला स्पेल टाकून बॉल थोडा जुना केला की, लगेच स्पिनर्स बॉलिंगला यायचे. त्यामुळे फास्ट बॉलर्सना आपली क्षमता दाखवायची संधी मिळत नसायची. टीम इंडियाच्या तेव्हाच्या या गेम प्लॅनमूळे नुकसान झालेले एक बॉलर होते पुणेकर वसंत रांजणे.

आजकालच्या पिढीला हे नाव माहीत नसेलच. आजकालच्या पिढीचं काय 1990 मध्ये त्यांना ओळखणारे लोक नव्हते ही शोकांतिका. कारण होतं त्यांचं नशीब. रांजणे हे पुणेकर. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करायचे आणि आई नायडू हॉस्पिटलमध्ये आया. ते अवघ्या दहा वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले. आईला जी क्वार्टर मिळालेली तिथेच हे माय लेक राहत होते. एक रूम आणि बाहेर व्हरांडा इतकच ते घर. घरची गरीबी होती म्हणून चुलीवर स्वयंपाक केला जायचा. अर्थातच लाकूड वगैरे तोडून आणण्याची जबाबदारी वसंत यांचीच. त्या गरिबीच्या चटक्यांनी वसंत कणखर बनले.

ते जिथे राहायचे त्याच्या अगदी बाजूलाच शिवाजी प्रिपेरेटरी स्कूल होते. बाहेरच्या जाळीतून आतमध्ये मुलं क्रिकेट खेळतात हे दिसायचं. त्यावेळी स्कूलचे कोच होते मधुसुदन रेगे. महाराष्ट्र आणि टीम इंडियासाठी ते खेळलेले. वसंत त्यांना त्या नेट मधूनच पाहून-पाहून बॉलिंग शिकले. अगदी एकलव्याप्रमाणे. ते चांगली बॉलिंग करायचे हे तिथल्या संगमवाडी क्रिकेट क्लबला समजले. त्यांनी वसंत यांना आमच्यासाठी खेळणार का असे विचारले. ना म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. नेमकी संगमवाडी संघाची मॅच होती त्यावेळी पुण्यात दबदबा असलेल्या विलास क्रिकेट क्लबविरुद्ध. ती मॅच पाहायला आलेले महाराजा ऑफ देवास. ते तेव्हा विलास क्लबला स्पॉन्सर करायचे. वसंत रांजणे यांनी पहिल्याच इनिंगमध्ये विलास क्लबचे नऊ विकेट घेतले. सर्वांना आश्चर्यचकित करणारी ही कामगिरी होती, तेव्हा महाराजा ऑफ देवास आणि विलास क्लबचे कोच दिवाडकर यांनी ताबडतोब रांजणे यांना सांगितलं उद्यापासून तुम्ही विलास क्लबसाठी खेळाल. विलास क्लबसाठी खेळण्याचे‌ दोन फायदे होते, एक चार पैसे हातात येणार होते आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्रासाठी खेळायचं असेल, तर लवकर संधी मिळणार होती. दोन्ही गोष्टी साध्य झाल्या.

एका वर्षात वसंत रांजणे महाराष्ट्राच्या टीममध्ये आले. सौराष्ट्रविरुद्ध त्यांना पहिला चान्स मिळाला. एखाद्याची नजर लागावी अशी बॉलिंग त्यांनी केली. पुन्हा एकदा एकाच इनिंगमध्ये 9 विकेट्स. त्यातही एक हॅट्रिक. आजही रणजीच्या इतिहासातील हा रेकॉर्ड अबाधित आहे. टीम इंडियापर्यंत जायला त्यांना अजिबात उशीर लागला नाही. पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी धोकादायक बॉलिंग केली. मात्र, हे रांजणे आपल्याला धोका निर्माण करता येत हे पाहून त्यावेळच्या खूंखार वेस्ट इंडिज बॉलर्सने त्यांच्यावर बाऊंसरची बरसात केली. एक बॉल मांडीवर असा लागला की ते जायबंदी झाले. पुन्हा त्या मॅचमध्ये बॉलिंग करू नाही शकले.

त्यांचा एक किस्सा असा की, टीम इंडिया 1961 मध्ये वेस्ट इंडीज टूरवर गेली असताना, त्यावेळचे कॅप्टन नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांना लंगडताना पाहिले. त्यांनी रांजणे यांना काय झाले? असे विचारले असता ते म्हणाले मला बुटातील खिळा टोचत आहे. नक्की भानगड काय आहे हे पाहण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांना बूट काढायला लावले, तर आतमध्ये त्यांचा मोजा रक्ताने माखला होता. हे का लपवलं? म्हणून कॉन्ट्रॅक्टर रागावले. त्यावर रांजणे यांचे उत्तर होतं, “देशासाठी एवढं तर मी सहन करू शकतो.”

पुढे अभावानेच त्यांना संधी मिळत राहिली. 7 वर्षाच्या काळात फक्त सात इंटरनॅशनल मॅच खेळून त्यांचं करिअर थांबलं. त्या वेळचे अनेक जण म्हणतात वसंत रांजणे आणि रमाकांत देसाई ही जोडी भारतासाठी बराच काळ खेळायला हवी होती. दुर्दैवाने असं झालं नाही. रांजणे महाराष्ट्र सोडून रेल्वेसाठी खेळू लागले. मात्र, पगारात तितकी वाढ झाली नाही. त्यांची पत्नी त्यांच्या आईच्या जागी नायडू हॉस्पिटलमध्ये काम करू लागली. घरही तेच. चाळीशीत ते महाराष्ट्रासाठी असिस्टंट कोच, असिस्टंट मॅनेजर म्हणून जायचे. तिथे तरुण खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन व्हावे म्हणून स्वतः बॉलिंग करायचे. त्या वेळचे खेळाडूदेखील त्यांचे बॉल शिवू शकत नसायचे. चाळीशीतही कमालीचा वेग त्यांनी राखलेला.

सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या रांजणे यांना रेल्वेमध्ये फिटरचे काम मिळालेले मात्र पैसा नव्हता. ज्या वेस हॉल यांनी सुरुवातीच्या काळात त्यांची मांडी जायबंदी केलेली त्याच हॉल यांनी 1983 मध्ये त्यांच्यासाठी मॅच खेळली. 1984 ला भारतीय क्रिकेटर संदीप पाटील आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांनी आपल्या षटकार या पाक्षिकातून रांजणे यांना मदत म्हणून जवळपास दीड लाख रुपये जमा केले. त्याने त्यांची परिस्थिती थोडीफार सुधारली मात्र ते श्रीमंत झाले नाही.

मुले शिकली आणि चांगली नोकरी करू लागली मात्र रांजणे त्याचा आपल्या आईच्या घरी राहत होते. त्यांचा मुलगा सुभाष महाराष्ट्रासाठी खेळला. क्रिकेटची परंपरा तिसऱ्या पिढीतही कायम राहिली. नातू शुभम रांजणे महाराष्ट्र-मुंबईसाठी खेळला. आता गोव्यासाठी आपलं कसब पणाला लावतोय. वसंत रांजणे यांना 74 वर्षांचे आयुष्य लाभलं. ते शेवटपर्यंत त्याच आपल्या आईच्या घरात राहिले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वसंत रांजणे यांना बॉलिंग करताना पाहिलेले लोक सांगतात, “ते टॅलेंट, मेहनत आणि कौशल्य यात कुठेच कमी नव्हते. कमी होती ती नशिबाची. शाप होता गरीबीचा. हेच वसंत रांजणे जर इंग्लंड-ऑस्ट्रेलियात जन्मले असते तर आज क्रिकेट इतिहासातील एक सुवर्णपान असते.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संघ 1, आणि गोलंदाज 11: भारताची क्रिकेटविश्वातील सर्वात दुर्मिळ घटना, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचाच
दुर्दैवी! दुखापतींमुळे ‘या’ क्रिकेटपटूंच्या करिअरला कायमचा लागला ब्रेक, यादीत एका भारतीयाचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---