जगभरातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीगला ओळखले जाते. या लीगमध्ये खेळून युवा खेळाडूंना भारताच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळते. यंदाच्या १५व्या आयपीएल हंगामातही असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्या कामगिरीवर निवडकर्त्यांची करडी नजर आहे. या यादीत युवा फलंदाज शुबमन गिलच्या नावाचाही समावेश आहे. तो आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्स या नव्याने सामील झालेल्या संघाकडून खेळतोय. गिलला सुरुवातीच्या सामन्यांनंतर त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रानेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा असा विश्वास आहे की, खराब कामगिरीमुळे गिलच्या राष्ट्रीय संघात निवड होण्याच्या अपेक्षांना तडा बसू शकतो.
या हंगामात आपल्या सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये शुबमन गिलने (Shubman Gill) २ अर्धशतके झळकावले होते. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ९६ इतकी होती. मात्र, यानंतर त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलेलाच नाहीये. मागील ६ डावात त्याने फक्त ३१ धावांची सर्वोच्च खेळी केली आहेत.
मंगळवारी (०३ एप्रिल) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर गुजरात संघ पंजाब किंग्सविरुद्ध (Gujarat Titans vs Punjab Kings) भिडणार आहे. या सामन्यापूर्वीच आकाश चोप्राने गिलबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “शुबमन गिलला पुन्हा मोठ्या धावा करण्याची गरज आहे. गुजरात त्याच्या मोठ्या धावसंख्येशिवाय सर्व गोष्टी सांभाळून घेत आहे, परंतु निवडकर्त्यांची त्याच्यावर करडी नजर आहे की, तो धावा काढत नाहीये, ही त्याच्यासाठी चांगली गोष्ट नाहीये. यासोबतच हार्दिक पंड्याही त्याच्या लयीपासून विचलित झाला आहे. त्याच्या योगदानाशिवाय ते चांगली कामगिरी करत आहेत, परंतु जर त्याने धावा केल्या नाहीत, तर संघ दीर्घकाळ संघर्ष करेल.”
गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र, मागील २ सामन्यांपासून त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याला उमरान मलिकने १० धावांवरच तंबूचा रस्ता दाखवला होता. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो फक्त ३ धावा करून पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ झाला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गोलंदाजी विभागाबद्दल काय म्हणाला आकाश चोप्रा?
आकाश चोप्राने मान्य केले की, गुजरात संघाकडे एक चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. मात्र, त्याने या गोष्टीसाठी त्यांची प्रशंसा केली की, गोलंदाजांच्या खराब दिवसानंतरही संघ कोणत्या तरी मार्गाने विजयाचा रस्ता शोधतोच. तो म्हणाला की, “गुजरातकडे उत्तम गोलंदाज आहेत, पण ते प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत आहेत असे नाही. लॉकी फर्ग्युसन गेल्या दोन सामन्यांमध्ये महागडा ठरला आहे. राशिद खानविरुद्धही धावा झाल्या आहेत आणि तो जास्त विकेट घेत नाहीये. तरीही, ते सामना जिंकण्याचे मार्ग शोधतात. ते सर्वांना आश्चर्यचकित करत आहेत.”
शुबमन गिलची यंदाच्या हंगामातील कामगिरी
शुबमन गिलने आतापर्यंत खेळलेल्या आयपीएल २०२२मधील ९ सामन्यांमध्ये २८.८९च्या सरासरीने २६० धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने २ अर्धशतकेही झळकावली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील धोनीची लोकप्रियता पाहून भारावला निकोलस पूरन; म्हणाला, ‘मी कधीच विसरणार नाही…’
स्वत:ला दिलेल्या वचनाला जागला रिंकू सिंग; सामन्यापूर्वी हातावर लिहिली होती प्रेरणा देणारी ‘ही’ गोष्ट