पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्स संघ 16व्या हंगामात संमिश्र कामगिरी करताना दिसत आहे. संघाव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा हादेखील दोन आकडी धावा करताना संघर्ष करत आहे. अशात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या रवी शास्त्रींनी रोहितला संदेश दिला आहे. त्यांचा विश्वास आहे की, रोहितच्या कामाचा भार हा मागील वर्षांमध्ये दुप्पट झाला आहे, ज्याने रोहितच्या बॅटमधून धावा निघत नसल्यामुळे त्याच्या नेतृत्वावरही परिणाम झाला आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) मागील हंगामातही खास कामगिरी करू शकला नव्हता. त्याचा संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फक्त 14 सामने खेळून 4 विजयांसह गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर होता. यावेळीही अशीच काहीशी परिस्थिती दिसत आहे. त्याच्याकडून जशी अपेक्षा केली जाते, तसा रोहितच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत नाहीये. मुंबई संघ सध्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या गुणतालिकेत 10 गुणांसह सहाव्या स्थानी आहे.
रवी शास्त्रींचे वक्तव्य
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मान्य केले की, बॅटमधून चांगली कामगिरी होत नसल्यामुळे रोहितच्या नेतृत्वावर परिणाम झाला आहे. ते म्हणाले की, “जर तुम्ही धावा करत आहात, तर एक कर्णधार म्हणून तुमचे काम खूप सोपे होते. मैदानावरील हावभाव बदलतात. जेव्हा तुम्ही धावा करत नाहीत, तेव्हा मैदानावरील ऊर्जा वेगळी असते. तुम्ही कोणीही असाल, पण निराशेपासून वाचू शकत नाही.”
पुढे बोलताना शास्त्री म्हणाले की, “ही ती जागा आहे, जिथे एक कर्णधार म्हणून तुमचे प्रदर्शन समोर येणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र, रोहितसाठी हंगाम अद्याप संपला नाहीये. जर तो इथून पुढे जरी फॉर्ममध्ये आला, तरी संघ आणि त्याच्यासाठी वाट सोपी होईल.”
रोहितची हंगामातील कामगिरी
आयपीएल 2023 स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा हा चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. कारण, त्याने 10 सामन्यात 18.39च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 126.89 इतका आहे. यामध्ये तो दोन वेळा शून्यावरही बाद झाला आहे. अशाप्रकारे तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक 16 वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडूही ठरला. (former cricketer ravi shastri message to rohit sharma on poor form in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! WTC फायनलसाठी टीम इंडियातून केएल राहुलचा पत्ता कट, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
RCB संघ IPL 2023च्या प्ले-ऑफमध्ये कशी करू शकतो एन्ट्री? सोप्या पद्धतीने घ्या जाणून