सध्या क्रिकेटविश्वात वर्णद्वेषाचा मुद्दा चर्चेत आहे. इंग्लंडचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अझीम रफिक याने त्याच्या स्वत:चा क्रिकेट क्लब यॉर्कशायर आणि सहकारी खेळाडूंवर वंश आणि रंगाच्या आधारावर भेदभाव केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे, इंग्लड क्रिकेटमध्ये गोंधळ उडाला आहे. आता भारतीय क्रिकेट संघाच्या माजी फिरकीपटूने त्वचेच्या रंगावरून आपल्याच देशात भेदभावाचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला आहे.
सन १९८० च्या दशकातील फिरकीपटू आणि सध्या प्रसिद्ध क्रिकेट समालोचक असलेल्या लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी म्हटले आहे की, त्यांना त्यांच्या वर्णामुळे आयुष्यभर भेदभावाला सामोरे जावे लागले आहे.
माजी लेगस्पिनर शिवरामकृष्णन हे सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कानपूर कसोटीत इंग्लिश कॉमेंट्री पॅनलचा एक भाग आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून तो सातत्याने समालोचन करत आहे. मात्र, नेहमीप्रमाणे इतर अनेक समालोचकांप्रमाणे शिवरामकृष्णन यांच्या समालोचनातील काही गोष्टी काही चाहत्यांना आवडल्या नाहीत. नाराज चाहते ट्विटरवर आपला संताप आणि नाराजी व्यक्त करत असतात. अशा परिस्थितीत एका ट्विटर वापरकर्त्याने माजी भारतीय फिरकीपटूचा बचाव केला आणि लिहिले की त्याच्या समालोचनावर टीका करणे चुकीचे आहे.
भारतासाठी ९ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ विकेट घेणारे शिवरामकृष्णन यांनी या ट्विटला उत्तर दिले की, मला अशा प्रकारच्या टीकेवर हरकत नाही. कारण, त्यांना त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच वर्णभेद आणि टीकेचा सामना करावा लागत आहे. आपल्या ट्विटमध्ये शिवरामकृष्णन यांनी लिहिले, “माझ्या रंगामुळे मी आयुष्यभर भेदभाव आणि टीकेचा सामना केला आहे. त्यामुळे मला त्याचा त्रास होत नाही. दुर्दैवाने ते माझ्याच देशात घडले.”
वर्णभेद भारतात नवीन नाही, पण तो फारसा गांभीर्याने कधीच घेतला जात नाही. हेच कारण आहे की, आयपीएलमध्ये खेळताना वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमीलाही त्याचाच सहकारी भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माने शरीराच्या रंगाच्या आधारे नावाने हाक मारली होती. सॅमीने गेल्या वर्षीच याचा खुलासा केला होता.
या विषयावर भारतीय खेळाडूंबाबत सांगायचे झाले तर, गेल्या वर्षी शिवरामकृष्णन यांच्याआधी माजी भारतीय वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांनीही वांशिक भेदभावाच्या अनुभवाबद्दल सांगितले होते. त्याचवेळी भारतीय संघ आणि तामिळनाडूचा माजी सलामीवीर अभिनव मुकुंद यानेही अशा गैरवर्तनाबद्दल बोलले आहे.