कोणत्याही क्रिकेट स्वरुपात टिकून राहण्यासाठी क्रिकेटपटूला त्याच्यात प्रदर्शनात सातत्य ठेवावे लागते. जर त्याच्या प्रदर्शनात बिघाड झाले, तर त्याचे संघातील स्थान धोक्यात येते. याचे ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर, मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज इशान किशन. आयपीएल २०२० मधील प्रशसंनीय कामगिरीमुळे प्रकाशझोतात आलेला इशान यावर्षी संघर्ष करताना दिसत आहे.
परिणामत: गुरुवारी (२९ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२१ च्या २४ व्या सामन्यात त्याला संघाबाहेर बसावे लागले होते. यानंतर क्रिकेट चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटूपर्यंत अनेकांनी मुंबई संघाच्या व्यवस्थापनाच्या या निर्णयाची टिका केली आहे. यात वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनीही उडी घेतली आहे.
स्पोर्ट टुडेशी बोलताना क्रिकेटविश्वातील या सार्वकालिन फलंदाजाने इशानला आपला पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले की, “केव्हा केव्हा तुम्हाला खूप सावधानी बाळगून निर्णय घेण्याची गरज असते. तुम्ही चेन्नईमध्ये आयपीएल २०२१ चे सामने खेळले आहेत आणि आता तुमचा तिथे एकही सामना होणार नाही. चेन्नईच्या खेळपट्टीवर मुंबई संघातील जवळपास सर्वच फलंदाज संघर्ष करताना दिसले. यावेळी तुम्ही क्विंटन डी कॉकला बाहेर करु शकत होता आणि क्रिस लिनला पुन्हा आजमावून पाहू शकत होता. त्याने नक्कीच धावा केल्या असत्या. परंतु तुम्ही त्याला पुन्हा संधी दिली नाही.”
“इशानबाबतही अगदी असेच झाले आहे. जर मी कर्णधार रोहित शर्मा किंवा संघ व्यवस्थापनाच्या जागी असतो, तर इशानला अजून एकदा संधी दिली असती आणि पाहिले असते की त्याचा फॉर्म नक्की कसा आहे. तो सध्य घडीचा एक मॅच विनर फलंदाज आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई-राजस्थान सामन्यात इशानला बाकावर बसवत त्याच्याजागी नाथन कूल्टर नाईल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडण्यात आले होते. इशानची बॅट या हंगामात थंडावली आहे. आतापर्यंत त्याने आयपीएल २०२१ मध्ये ५ सामने खेळताना अवघ्या ७३ धावा केल्या आहेत. दरम्यान २८ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे. आता इशान त्याच्या खराब फॉर्मवर मात करत पुनरागमन करेल का नाही, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० वर्ल्ड कप कुठेही होऊद्या, यजमानपद बीसीसीआयच्याच हाती; अधिकाऱ्याने दिली महत्त्वाची माहिती
ललितने अश्विनसारखी गोलंदाजी करत घेतली अविश्वसनीय विकेट, प्रशिक्षक पाहून झाले दंग; बघा व्हिडिओ