लंडन। टेनिस जगतात सध्या विम्बल्डन स्पर्धेची रंगत पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत पहिल्याच दिवशी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. तो म्हणजे यावर्षीच्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा उपविजेता स्टिफानोस त्सित्सिपासला पहिल्याच फेरीत पराभव स्विकारावा लागला आहे. त्याला अमेरिकेच्या फ्रान्सेस तियाफोने पराभवाचा धक्का दिला.
तिसऱ्या मानांकित त्सित्सिपासला तियाफोने ६-४, ६-४, ६-३ अशा सरळ ३ सेटमध्ये पराभूत करत विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या लढतीत तियाफोने एकही सर्विस गमावली नाही.
सामन्यानंतर तियाफो म्हणाला, ‘मला यांसारखे सामने आवडतात. मी एका स्टार खेळाडूविरुद्ध चांगले टेनिस खेळले. मला माझ्या स्वत:ला जिंकण्याची एक संधी द्यायची होती आणि मी ते केले. मी सकाळी उठलो तेव्हा, स्वत:शी हेच म्हटलं की मी आज स्टिफानोसला पराभूत करणार आणि तसंच झालं. जेव्हा कोणाचाही विश्वास नसतो, तेव्हा करुन दाखवणे मोठी गोष्ट असते.’
Two sets up against the No.3 seed 👏
Frances Tiafoe is enjoying himself on No.1 Court…#Wimbledon pic.twitter.com/jiL7u0Wyzx
— Wimbledon (@Wimbledon) June 28, 2021
तियाफो आणि त्सित्सिपासमधील सामना २ तास २ मिनिटे चालला. या सामन्यातील पहिल्याच सेटमध्ये कियाफोने शानदार सुरुवात केली. त्याने २-० अशी आघाडी मिळवली होती. ही आघाडी टिकवून ठेवत त्याने पहिला सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये दोघांमध्ये चांगली झुंज पाहायला मिळाली. पहिल्या ८ गेममध्ये ४-४ अशी बरोबरी झाली होती. पण अखेर तियाफोने ब्रेक पाँइंट मिळवला आणि पुढे हा सेट जिंकत सामन्यात आघाडी मिळवली. तियाफोने तिसऱ्या सेटमध्ये त्याची लय कायम राखत सामना जिंकला. तियाफोने तिसऱ्यांदा विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
आता त्याला दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या वसेक पॉस्पिसिलचे आव्हान असेल. पॉस्पिसिलने पहिल्या फेरीत रोबेर्तो कार्लबेल बिएनला पराभूत केले आहे.
फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात खेळला त्सित्सिपास
यावर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करत २२ वर्षीय त्सित्सिपासने इतिहास रचला होता. तो ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी खेळणारा पहिला ग्रीक टेनिसपटू ठरला होता. मात्र अंतिम फेरीत त्याला सार्बियाच्या नोवाक जोकोविचकडून पराभव स्विकारावा लागल्याने त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
टेनिस चाहत्यांना मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूची टोकियो ऑलम्पिकमधून माघार
फ्रेंच ओपन विजेत्या जोकोविचकडून चिमुकल्या चाहत्याला ‘ग्रेटभेट’, तोही आनंदाने गेला भारावून