दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. इंग्रजांपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधीजींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळे भारतातील सर्व चलनी नोटांवर त्यांचं चित्र छापलेलं आहे.
केवळ भारतच नाही, तर जगातील सर्व देश आपापल्या चलनावर महान व्यक्तींची चित्रं छापतात. ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात प्रसिद्ध असली तरी ती त्या देशाची ओळख आणि प्रतीक असते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, असा एक क्रिकेटरही आहे, ज्याचा फोटो एका देशाच्या चलनावर छापला होता. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे!
वास्तविक, कॅरेबियन बेटांमधील बार्बाडोस या देशाच्या चलनी नोटेवर महान खेळाडू आणि माजी कर्णधार फ्रँक वॉरेलचा फोटो छापण्यात आला होता. फ्रँक वॉरेल वेस्ट इंडिजकडून क्रिकेट खेळायचे. ते प्रथम 1941 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर आले होते. 1963 मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजकडून कसोटी पदार्पण केलं. फ्रँक वॉरेल यांनी वेस्ट इंडिजसाठी एकूण 51 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 49.48 च्या सरासरीनं 3860 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 9 शतकं आणि 22 अर्धशतकं आहेत.
फ्रँक वॉरेल क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजीसोबतच आपल्या माणुसकीसाठीही ओळखले जायचे. त्यांचं नाव वृत्तपत्रांमध्ये दररोज त्यांच्या चांगल्या कामांसाठी छापलं यायचं. त्यांनी एका माजी भारतीय क्रिकेटपटूची मोठी मदत केली होती, जी कोणीही विसरु शकणार नाही.
ही घटना 1962 मध्ये भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर घडली. या दौऱ्यातील एका सामन्यात भारतीय कर्णधार नारी कॉन्ट्रॅक्टर यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना दवाखान्यात न्यावं लागलं. डॉक्टरांनी कॉन्ट्रॅक्टर यांना रक्ताची गरज असल्याचं सांगितलं. फ्रँक वॉरेल यांना याची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन रक्तदान केलं.
एवढेच नाही तर, फ्रँक वॉरेल यांनी ज्या काळात वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये गोऱ्या खेळाडूंचा दबदबा होता, त्या काळात कृष्णवर्णीय खेळाडू म्हणून संघाची धुरा सांभाळली होती. खेळातील हे योगदान लक्षात घेऊन, सेंट्रल बँक ऑफ बार्बाडोसनं त्यांचा फोटो पोस्टाचे तिकिटं आणि चलनी नोटांवर छापला होता. दुःखाची गोष्ट म्हणजे, फ्रँक वॉरेल यांनी वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी हे जग सोडलं.
हेही वाचा –
“केएल राहुल लिलावात गेला तर त्याला इतके कोटी मिळतील”, आकाश चोप्राचा लखनऊला इशारा
जसप्रीत बुमराहचा मोठा धमाका, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप! टॉप 5 गोलंदाज जाणून घ्या
रोहित शर्माच्या या ‘मास्टरप्लॅन’मुळे बांगलादेशचा पराभव, अश्विननं उघड केलं रहस्य