पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर पहिल्या हिरो इंडियन सुपर लिगदरम्यान 14 वर्षांचा अनिकेत जाधव प्रीतम कोटल आणि लेनी रॉड्रीग्ज अशा नामवंत खेळाडूंना बॉल पास करीत होता. या गोष्टीला फार वर्षे झालेली नाहीत. आता पाच वर्षांच्या कालावधीत हाच अनिकेत जमशेदपूर एफसीचे प्रतिनिधीत्व करीत अशा खेळाडूंना सामोरे जाण्यास सज्ज झाला आहे.
कोल्हापूरचा हा तरुण 2017 मध्ये 17 वर्षांखालील फिफा विश्वकरंडक स्पर्धेतील पराक्रमामुळे प्रकाशझोतात आला. 22 ऑक्टोबर रोजी मंगळवारी त्याचे आयएसएल पदार्पणाचे स्वप्न साकार झाले. जमशेदपूरमधील जेआरडी टाटा क्रीडा संकुलातील लढतीत ओदीशा एफसीविरुद्ध तो स्टार्टिंग लाईन-अपमध्ये होता.
19 वर्षीय अनिकेतने विश्वकरंडक स्पर्धेनंतर इंडियन अॅरोज या संघाकडून आपली विकासप्रक्रिया पुढे सुरु ठेवली. तो म्हणाला की, हिरो आयएसएलमधील माझ्या पहिल्या मोसमात जमशेदपूर एफसीमधील आगमनामुळे मी रोमांचित झालो आहे. या मोसमासाठी मी उत्सूक आहे.
जमशेदपूर एफसीची निवड का केली, याविषयी त्याने सांगितले की, मी सुरवातीला सुब्रत पॉल आणि स्टीव्हन डायस (जमशेदपूर एफसीचे सहाय्यक प्रशिक्षक) अशा खेळाडूंना प्रेरणास्थान मानायचो. पहिल्या दोन मोसमांमध्ये मी पुण्यातील सामन्यांच्यावेळी बॉल बॉय म्हणून काम करायचो. जमशेदपूरशी करार करण्यापूर्वी मी पाच-सहा वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा केली, सर्वांनीच क्लबमधील सुविधा आणि संस्कृतीबद्दल भरभरून कौतूक केले.
अनिकेतने इंग्लंडमधील ब्लॅकबर्न रोव्हर्स क्लबम्ये तीन महिन्यांच्या लक्षणीय काळात उपयुक्त ट्रेनिंग घेतले. त्यातून मिळालेला बहुमोल अनुभव या मोसमात खेळताना कामी आणण्याची त्याला आशा आहे.
त्याने सांगितले की, हा दौरा मला अनुभवासाठी चांगला ठरला. एक व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून मी बरेच शिकलो. ब्लॅकबर्न रोव्हर्समधील प्रशिक्षक आणि खेळाडूंकडून बरेच ज्ञान आत्मसात करता आले. मी जे शिकलो त्याचा हिरो आयएसएलमध्ये नक्कीच अवलंब करेन.
अनिकेतला मागील मोसमातच जमशेदपूर एफसीने हेरले होते. त्याला पुन्हा अॅरोजकडे लोनवर पाठविण्यात आले. अनुभवी सी. के. विनीत आणि भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू फारुख चौधरी अशा खेळाडूंच्या उपस्थितीत जमशेदपूर एफसीच्या स्टार्टींग लाईन-अपमध्ये स्थान मिळविणे अवघड असल्याची कल्पना अनिकेतला आहे, पण त्याने आपला मार्ग मेहनतीने तयार केला आहे.
आता आयएसएलमधील थरार एका तासाच्या खेळात अनुभवल्यानंतर तो अशा अनुभवासाठी आणखी उत्सूक बनला असेल.