चेन्नई। शनिवारी (१७ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्सने १३ धावांनी जिंकली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या विकेटची बरीच चर्चा झाली. आक्रमक खेळ करत असताना त्याला हिट विकेटमुळे त्याची विकेट गमवावी लागली.
या सामन्यात मुंबईने हैदराबादला १५१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेअरस्टोने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्याने ट्रेंट बोल्टच्या एकाच षटकात १८ धावा देखील चोपल्या होत्या. मात्र ३ चौकार आणि ४ षटकारांची बरसात केल्यानंतर त्याला हिट विकेट होत ८ व्या षटकात माघारी परतावे लागले.
कृणाल पंड्याने टटाकलेल्या ८ व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात त्याचा पाय स्टंपला लागला आणि स्टंपवरील बेल्स पडल्या. त्यामुळे बेअरस्टो हिट विकेट झाला. त्याला २२ चेंडूत ४३ धावांवर आपली विकेट गमवावी लागली. त्यामुळे आयपीएलमध्ये हिट विकेट होणारा तो एकूण १२ वा खेळाडू ठरला. यापूर्वी २००८ आयपीएल हंगामापासून एकूण ११ खेळाडू हिट-विकेट झाले होते.
आयपीएलमध्ये हिट विकेट झालेले खेळाडू –
१. मुसाविर खोटे – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, (गोलंदाज -एस श्रीसंत) आयपीएल २००८
२. मिसबाह-उल-हक – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, (गोलंदाज – एस श्रीसंत) आयपीएल २००८
३. स्वप्निल अस्नोडकर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, (गोलंदाज – एल्बी मॉर्केल) आयपीएल २००९
४. रविंद्र जडेजा – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध डेक्कन चार्जर्स, (गोलंदाज – डेल स्टेन) आयपीएल २०१२
५. सौरभ तिवारी – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, (गोलंदाज – हरभजन सिंग) आयपीएल २०१२
६. युवराज सिंग – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, (गोलंदाज – मिशेल मॅक्लेनाघन) आयपीएल २०१६
७. दीपक हूडा – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (गोलंदाज – नॅथन कूटर-नाईल) आयपीएल २०१६
८. डेव्हिड वॉर्नर – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, (गोलंदाज – अक्षर पटेल) आयपीएल २०१६
९. शेल्डन जॅक्सन – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राइजिंग पुणे सुपरजायंट्स, (गोलंदाज – वॉशिंग्टन सुंदर) आयपीएल २०१७
१०. रियान पराग – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, (गोलंदाज – आंद्रे रसेल) आयपीएल २०१९
११. हार्दिक पंड्या – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, (गोलंदाज – आंद्रे रसेल) आयपीएल २०२०
१२. जॉनी बेअरस्टो – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, (गोलंदाज – कृणाल पंड्या) आयपीएल २०२१
हैदराबादचा सलग तिसरा पराभव
हैदराबादकडून बेअरस्टो बाद झाल्यानंतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्याच्यानंतर केवळ कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त अन्य खेळाडूंना खास काही करता आले नाही. त्यामुळे हैदराबादला १९.४ षटकात सर्वबाद १३७ धावाच करता आल्या आणि हैदराबादचा १३ धावांनी पराभव झाला. हैदराबादचा या हंगामातील हा सगल तिसरा पराभव आहे.
मुंबईकडून ट्रेंट बोल्ट आणि राहुल चाहरने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर कृणाल पंड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १५० धावा केल्या होत्या. मुंबईकडून यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉकने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तसेच किरॉन पोलार्डने नाबाद ३५ आणि कर्णधार रोहित शर्माने ३२ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला १५० धावांचा टप्पा पार करता आला.
हैदराबादकडून मुजीब उर रेहमान आणि विजय शंकरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर खलील अहमदने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ अविश्वसनीय! एकाच सामन्यात हार्दिकचे दोन जबरदस्त रनआऊट, पाहा व्हिडिओ
या इंग्लिश फिरकीपटूने करून दिली वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ ची आठवण, पाहा व्हिडिओ
हिटमॅनची कमाल! एमएस धोनीला मागे टाकत ‘या’ विक्रमाला घातली गवसणी