ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघ बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत ०-१ असा पिछाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा सामना येत्या २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवला जाईल. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली अपत्यजन्मासाठी पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतणार आहे. त्यामुळे उर्वरित कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. पहिल्या सामन्यात दारूण पराभव पत्करल्याने भारतीय संघासमोर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पुनरागमन करण्याचे कडवे आव्हान असेल. त्यासाठी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने रहाणेला महत्वाचा सल्ला दिला आहे.
पाच गोलंदाजांसह उतरावे मैदानात
क्रिकइंफो संकेतस्थळाशी बोलताना गंभीरने मेलबर्न कसोटीत भारतीय संघाने पाच गोलंदाज खेळवावे, असे सुचविले. तो म्हणाला, “रहाणेने दुसऱ्या सामन्यात नक्कीच पाच गोलंदाज खेळवावे. रवींद्र जडेजा सध्या उत्तम लयीत आहे, त्यामुळे सातव्या क्रमांकावर त्याला संधी देण्यात यावी. आठव्या क्रमांकावर आर अश्विन खेळू शकतो. आणि त्यांनतर तीन वेगवान गोलंदाज संघात असावे. याने संघाचा समतोल साधायला मदत होईल.”
गंभीरने रहाणेने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असेही सुचविले. त्यामागचे कारण सांगताना तो म्हणाला, “रहाणे चौथ्या क्रमांकावर आला तर ती एक सकारात्मक चाल असेल. त्याने स्वतः चौथ्या क्रमांकावर येऊन सामन्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करावा. शुभमन गिल किंवा केएल राहुल यापैकी जो फलंदाज खेळत असेल, त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी.”
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अनेक बदल करण्याची शक्यता आहे. विराट कोहली अनुपलब्ध असल्याने त्याच्या जागी केएल राहुलला संधी मिळू शकते. तसेच सलामीच्या जागी पृथ्वी शाॅ सातत्याने अपयशी ठरत असल्याने सराव सामन्यातील अर्धशतकवीर शुभमन गिल भारतीय डावाची सुरुवात करू शकतो. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हाताच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेला मुकणार असल्याने त्याच्या जागी नवदीप सैनी किंवा मोहम्मद सिराज पदार्पण करू शकतात. अष्टपैलू रवींद्र जडेजा तंदुरुस्त असल्यास त्यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
– ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस बनला इंग्लंड संघाचा फलंदाजी सल्लागार
– अफगाणिस्तान क्रिकेटसाठी खुशखबर; या ठिकाणी बनणार नवे स्टेडियम