ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू खेळाडू कॅमरन ग्रीनने (Camron green) इतिहास रचला आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका रंगत आहे. मालिकेचा शेवटचा सामना मकाय येथे खेळला गेला आहे. या सामन्यात युवा ऑलराउंडर ग्रीनने तुफानी फलंदाजी करत एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. प्रोटियाजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने केवळ 47 चेंडूंमध्ये शतक झळकावत त्याने हा पराक्रम केला.
ऑस्ट्रेलियाकडून वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात वेगाने शतक ठोकण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) नावावर आहे. 2023 मध्ये त्याने नेदरलँड्सविरुद्ध केवळ 40 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते. तर वनडे इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सकडे (Ab devilliers) आहे. त्याने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त 31 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. आजतागायत हा विक्रम डिव्हिलियर्सच्या नावावरच कायम आहे.
मकायमध्ये झालेल्या या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 50 षटकांत केवळ 2 गडी गमावून तब्बल 431 धावा केल्या. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 103 चेंडूंमध्ये 142 धावांची शतकी खेळी करत सर्वोच्च धावा केल्या. त्याचा जोडीदार आणि कर्णधार मिचेल मार्शने देखील 106 चेंडूंमध्ये 100 धावांचे शतक ठोकले. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कॅमरून ग्रीनने केवळ 55 चेंडूंमध्ये नाबाद 118 धावा झळकावल्या. शेवटी ऍलेक्स कॅरीनेही 37 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावा करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.





