राष्ट्रीय वरिष्ठ फेडरेशन ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपचा दुसरा दिवस (२३ मे) भारतीय ट्रॅक ऍंड फिल्डच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. पंजाबचा अव्वल धावपटू गुरिंदरवीर सिंगने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. केवळ १०.०९ सेकंदांत शर्यत पूर्ण करत तो देशातील सर्वात वेगवान धावपटू ठरला. तसेच १०.१० सेकंदांपेक्षा कमी वेळेच हे अंतर पार करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याची ही प्रभावी कामगिरी या हंगामात संपूर्ण आशिया खंडातील दुसरी सर्वात वेगवान वेळ आहे.
शनिवारी (२३ मे) बिरसा मुंडा ऍथलेटिक्स स्टेडियमवर जेव्हा गुरिंदरवीरने अंतिम रेषा ओलांडली, तेव्हा घड्याळ तब्बल १०.०९ सेकंदांवर थांबले. देशातील दोन सर्वोत्कृष्ट धावपटू, गुरिंदरवीर सिंग आणि अनिमेश कुजूर यांच्यातील स्पर्धा भारतीय ऍथलेटिक्सच्या इतिहासात दीर्घकाळ स्मरणात राहिल. राष्ट्रीय विक्रमासाठीही ही लढत दोघांमध्ये अटीतटीची झाली. स्पर्धेपूर्वी ओडिसाचे प्रतिनिधित्व करणारा अनिमेशने गेल्या वर्षी १०.१८ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमामुळे ही शर्यत जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता.
शुक्रवारी (२२ मे) झालेल्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी, गुरिंदरवीरने पहिल्या उपांत्य फेरीच्या हीटमध्ये १०.१७ सेकंदांची वेळ नोंदवत सगळ्यांना चकित केले. अवघ्या पाच मिनिटांनंतर अनिमेशने दुसऱ्या उपांत्य फेरीत १०.१५ सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम पुन्हा प्रस्थापित करत एकप्रकारे प्रत्युत्तर दिले.
दुसऱ्या दिवशी गुरिंदरवीरने १०.०९ सेकंदांची वेळ नोंदवत बाजी मारली. अनिमेश त्याच्यापेक्षा केवळ ०.११ सेकंद मागे राहुन दुसऱ्या स्थानी राहिला. प्रणव गुरव १०.२९ सेकंदांच्या वेळेसह तिसऱ्या स्थानी राहिला. प्रणव आणि गुरिंदरवीर हे रिलायन्स फाउंजेशनचे प्रतिनिधित्व करतात.
गुरिंदरवीरने या ऐतिहासिक कामगिरीसह भारतीय ऍथलेटिक्स महासंघ २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांसाठी निश्चित केलेला १०.१६ सेकंदांचा पात्रता निकष सहजपणे पार केला. त्याची १०.०९ सेकंदांची वेळ ही या हंगामातील कोणत्याही आशियाई धावपटूची दुसरी सर्वोत्तम वेळ आहे. या यादीत पहिल्या स्थानी जपानचा १९ वर्षीय फुकुतो कोमुरो आहे. त्याने यावर्षी मे महिन्यात १०.०८ सेकंदाची वेळ नोंदवली आहे.






