फ्राँसचा १८ वर्षीय युवा फलंदाज गुस्तव मॅकॉन याने आयसीसी पुरुषांच्या टी२० विश्वचषक युरोप क्वालिफायरमध्ये एका नंतर एक विक्रम बनवत क्रिकेटप्रेमींची वाह वाह लुटली आहे. त्याने आपल्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. नुकत्याच इस्टोनियाविरुद्ध शनिवारी (३० जुलै) झालेल्या टी२० सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत टी२० क्रिकेटमधील दिग्गज रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे सोडले आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा तो पहिलाच खेळाडू बनला आहे.
फ्राँसच्या विस्फोटक फलंदाज गुस्तव मॅकॉनने (Gustav McKeon) शनिवारी इस्टोनियाविरुद्ध झालेल्या टी२० विश्वचषक युरोप क्वालिफायरमध्ये (T20 World Cup Europe Qualifier 2022) शानदार फलंदाजी प्रदर्शन करत कारकिर्दीतील पहिल्या ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा फटकावण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
त्याने चेक रिपब्लिकविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ७६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर पुढील २ सामन्यात त्याने सलग २ शतके ठोकली. स्वित्झर्लंडविरुद्ध १०९ धावा आणि नॉर्वेविरुद्ध १०१ धावांची खेळी त्याने केली. त्यानंतर इस्टोनियाविरुद्ध पुन्हा त्याची बॅट तळपली आणि त्याने ५१ चेंडू खेळताना ५ षटकार व ९ चौकारांच्या मदतीने ८७ धावा फटकावल्या. अशाप्रकारे गुस्तव मॅकॉनने त्याच्या पहिल्या ४ टी२० सामन्यांमध्ये ३७७ धावा खात्यात नोंदवल्या आहेत. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आरोन फिंच याला मागे सोडले आहे. फिंचने त्याच्या पहिल्या ४ टी२० सामन्यांमध्ये ३४२ धावा केल्या होत्या.
याखेरीज गुस्तव मॅकॉनने सलग ४ टी२० डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रमही केला आहे. यापूर्वी अजहर अंदानी याने आपल्या पहिल्या ३ टी२० डावांमध्ये अनुक्रमे ४६ धावा, १०० धावा आणि ८१ धावा करत विश्वविक्रम केला होता. परंतु सलग ४ डावात ५० पेक्षा जास्त धावा करत गुस्तव मॅकॉनने त्याचा विश्वविक्रम मोडला आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धांबद्दल बोलायचे झाल्यास, कोणत्या एका स्पर्धेत किंवा मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही गुस्तव मॅकॉनने त्याच्या नावावर केला आहे. यापूर्वी रोमानियाच्या तरणजीत सिंगच्या नावावर हा विक्रम होता, ज्याने ६ डावात ३५७ धावा केल्या होत्या. यापूर्वी विराट कोहलीच्या नावावरही हा विक्रम होता. त्याने २०१४ विश्वचषकात ६ डावांमध्ये ३१९ धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रविंद्र जडेजामुळे ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, धोनीसारखा आहे फिनिशर
कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे