न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्माचे खूप कौतुक झाले होते. मात्र या कौतुकाच्या वर्षांवानंतर आता नव्या वादाचे वावटळ निर्माण झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटूंसाठी नवीन आहार योजना जारी केल्यानंतर या वादाला तोंड फुटले.
बीसीसीआयने संघाला फक्त ‘हलाल’ मांस देण्याची शिफारस केली आहे. खेळाडूंचे पोषण लक्षात घेऊन, सपोर्ट स्टाफ आणि वैद्यकीय पथकाने भारतीय क्रिकेटपटूंसाठी तयार केलेल्या नवीन आहार मेनूमध्ये पोर्क (डुकराचे मांस) आणि गोमांस यांचा समावेश न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, मेनूमध्ये हलाल मांस देण्याची शिफारस आहे. ही यादी व्हायरल होताच सोशल मीडियावर अनेकांनी बीसीसीआयविरोधात टीका करायला सुरुवात केली आहे. काही लोक भारतीय क्रिकेटपटूंच्या आहार मेनूमध्ये हलाल मांसाचा समावेश करण्याच्या विरोधात आहेत.
एका माजी भारतीय क्रिकेटपटूंनी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले, “आम्ही ज्यावेळी संघाचा भाग होतो त्यावेळी गोमांस अथवा डुकराचे मांस कधीही संघाच्या आहारात समाविष्ट नव्हते. भारतामध्ये तर अशी परिस्थिती कधी आलीच नाही.”
माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन आहार योजनेनुसार, खेळाडूंना स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी डुकराचे मांस आणि गोमांस कोणत्याही स्वरूपात खाण्याची परवानगी नाही. अहवालात पुढे असे म्हटले आहे की, जर एखाद्या खेळाडूला मांस खायचे असेल तर ते मांस फक्त हलाल असले पाहिजे, खेळाडू इतर कोणत्याही प्रकारचे मांस खाऊ शकत नाहीत.
हलाल मांस म्हणजे काय?
मांस मिळवण्यासाठी, प्राण्याला मारण्याची ही एक वेगळी प्रक्रिया आहे. हलाल मांसासाठी, प्राण्याच्या गळ्यावर वार करताना, त्याची श्वसनवाहिनी कापली जाते. त्यानंतर त्या प्राण्यांचे रक्त हळूहळू वाहत राहते, त्यामुळे त्याचा मृत्यू व्हायला वेळ लागतो. त्याच वेळी, झटका मांस प्रक्रियेत, प्राण्याला एकाच झटक्यात मारले जाते. या दोन प्रक्रिया वेगवेगळ्या धर्मात वापरल्या जातात. उदाहरणार्थ, हिंदू आणि शीख धर्मातील मांसाहारी लोक झटका मांस खातात, तर मुस्लिम धर्माचे लोक हलाल व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या मांसाला प्राधान्य देत नाहीत.