शनिवारपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे होणार आहे. या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या भारतीय संघ पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून 2-0 ने आघाडीवर आहे.
त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला शेवटचा कसोटी सामन्यात जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे. या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले आहेत.
त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीवर टीका करताना भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सला तिसऱ्या कसोटीत फलंदाजी करणार का असे विचारले आहे.
ऱ्होड्सने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याने हिरव्या रंगाची जर्सी घातलेली असून त्यावर 8 जर्सी क्रमांक आहे. या फोटोला कॅप्शन देताना ऱ्होड्सने लिहिले आहे की ‘पून्हा एकदा हिरवी आणि सोनेरी जर्सी घालून छान वाटत आहे. जरी ही फक्त मुंबईमध्ये चित्रिकरणासाठी घातली असली तरी.’
ऱ्होड्सच्या पोस्टवर हरभजनने प्रतिक्रिया दिली आहे की ‘तू रांचीमध्ये शेवटची कसोटी खेळू शकतो का, दक्षिण आफ्रिकेला फलंदाजाची गरज आहे.’
हरभजनला ऱ्होड्सनेही मजेदार उत्तर दिले आहे, त्याने म्हटले आहे की ‘हरभजन त्यांना माझ्यापेक्षाही बरेच काही पाहिजे आहे.’
असे असले तरीही हरभजनला त्याच्या प्रतिक्रियेमुळे काही चाहत्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा आदर कर असे सुनावले आहे.