क्रिकेटजगतात रोज जुने विक्रम मोडत असतात किंवा नवे विक्रम बनत असतात. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात नुकताच कानपूर येथे पहिला कसोटी सामना पार पडला आहे. या अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने दमदार गोलंदाजी करत खास विक्रम केला आहे. त्याने भारताचा मातब्बर फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याचा कसोटीतील ४१७ विकेट्सचा विक्रम मोडित काढला आहे. यानंतर हरभजनने अश्विनचे अभिनंदनपर ट्वीट करत लाखो क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.
३५ वर्षीय अश्विनने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात सलामीवीर टॉम लॅथम याला त्रिफळाचीत करत हा विक्रम केला आहे. दुसऱ्या डावात ३ आणि तत्पूर्वी पहिल्या डावात ३ विकेट्स घेत त्याने कसोटीतील ४१९ विकेट्सचा आकडा गाठला आहे. यासह तो हरभजनवर वरचढ ठरला आहे. लॅथम हा त्याची विक्रमी ४१८ वी विकेट्स ठरला आहे.
या सामन्यापूर्वी हरभजन हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज होता. परंतु आता अश्विनने त्याला मागे टाकले आहे. आता अश्विनपुढे केवळ २ गोलंदाज आहेत. ते म्हणजे, अनिल कुंबळे आणि कपिल देव. कुंबळे यांनी १३२ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना ६१९ विकेट्स घेतल्या होत्या. तर कपिल हे १३१ कसोटी सामन्यांमध्ये ४३४ विकेट्स घेत दुसऱ्या स्थानावर आहेत.
अश्विनने आपलाच विक्रम मोडित काढल्यानंतर हरभजनने त्याची पाठ थोपटली आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, ‘आर अश्विन, तुला खूप खूप शुभेच्छा माझ्या भावा. मी अपेक्षा करतो की, तू भविष्यातही असाच प्रगती कर आणि अजून जास्त विकेट्स घे. देवाचे तुझ्यावर असेच आशीर्वाद बनून राहो आणि तू असाच चमकत राहा.’
Congratulations @ashwinravi99 wish you many more brother.. God bless.. keep shining ????????
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 29, 2021
हरभजनने आपलाच मोठा विक्रम मोडणाऱ्या अश्विनची अशा शब्दांत स्तुती करत आणि त्याला पुढील कामगिरीसाठी प्रेरित करत अनेकांची मने जिंकली आहेत. याबद्दल सोशल मीडियावर त्याचे भरपूर कौतुक होते आहे.
विशेष म्हणजे, हरभजनने २०१५ साली कारकिर्दीतील १०३ वा कसोटी सामना खेळताना ४१७ विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. मात्र अश्विनने केवळ ८० व्या कसोटी सामन्यात ही उपलब्धी मिळवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघ ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन?
पदार्पणात भीषण अपघात, आफ्रिदीचा बाऊंसर डोक्याला लागल्याने बांगलादेशचा खेळाडू गंभीर जखमी
द्रविडने केएस भरतविषयी केली होती ‘ही’ भविष्यवाणी, व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितला किस्सा