ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग आणि भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांच्यात सामन्यादरम्यान अनेकदा काट्याची लढत व्हायची. आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये समाविष्ट असणाऱ्या पॉंटिंगला हरभजन कायम वरचढ ठरायचा. नुकतेच, हरभजनने पॉंटिंगविरूद्धच्या आपल्या या यशाचे गमक सांगितले आहे. पॉंटिंगला कशाप्रकारे दबावात आणून, त्याचा बळी मिळवण्यात आपण यशस्वी ठरायचो, हे हरभजनने स्पष्ट केले.
फिरकीपटूंविरूद्ध पॉंटिंग होता कच्चा
भारताच्या सर्वकालीन महान फिरकीपटूंमध्ये समाविष्ट असणाऱ्या हरभजनने पॉंटिंगला वारंवार बाद करण्यामागील कारणे सांगताना म्हटले, “पॉंटिंग क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक आहे, यात तिळमात्र शंका नाही. मात्र, एक वेळ अशी होती की, मी त्याच्यावर वर्चस्व गाजवायचो. मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना मला असे वाटायचे, मी पॉंटिंगच्या बरोबरीचा आहे.”
“वेगवान गोलंदाजांविरूद्ध सहजतेने फलंदाजी करणाऱ्या, पॉंटिंगला फिरकीपटूंविरूद्ध खेळताना समस्या यायची. मी त्यातील काही कमतरता हेरल्या होत्या. तो फिरकी गोलंदाजांसमोर बचाव करताना हलक्या हाताने खेळत नसायचा. त्यामुळे, उसळी घेणारा चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन शॉर्ट लेग किंवा बॅकवर्ड शॉर्ट लेगवर उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हाती जायचा. फिरकीपटूंविरुद्ध खेळताना तो दबावात यायचा,” असेही तो पुढे म्हणाला.
२००१ च्या कसोटी मालिकेत गाजवले होते पॉंटिंगवर वर्चस्व
हरभजनने भारताकडून १०३ कसोटी खेळताना ४१७ बळी मिळवले आहेत. हरभजन आपल्या कारकिर्दीदरम्यान पॉंटिंगला १० वेळा बाद करण्यात यशस्वी ठरला होता. २००१ च्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत सहापैकी पाच डावात हरभजनने पॉंटिंगची शिकार केली होती. इतर गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्या पॉंटिंगला हरभजनविरुद्ध फक्त २०० धावा काढण्यात यश लाभले होते.
पॉंटिंगबद्दल कायमच आदर राहील
आयपीएलवेळी मुंबई इंडियन्सकडून पॉंटिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हरभजनने त्याचे कौतुक करताना म्हटले, “पॉंटिंग सर्वकालीन महान फलंदाज आहे. एक फलंदाजच नाहीतर एक मार्गदर्शक म्हणूनही तो उत्तम आहे. मी ज्यांच्याविरुद्ध खेळलो त्यापैकी पॉंटिंग सर्वात्कृष्ट होता. मी त्याचा कायमच आदर करत राहील.”
भारतीय संघाने २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सलग १६ कसोटी विजयांचा विजयरथ रोखत कोलकाता कसोटीत विजय मिळवला होता. तीन सामन्यांच्या या मालिकेत हरभजनने ३२ बळी मिळवत भारताच्या मालिका विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यानंतरही, हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कायमच सरस कामगिरी केली. २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘मंकीगेट’ प्रकरण गाजले होते. हरभजनवर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्रू सायमंड्स याच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीची अनुपस्थिती ‘या’ खेळाडूसाठी ठरणार सर्वात फायदेशीर, हरभजन सिंगने सांगितले नाव
हरभजन सिंगचे खळबळजनक ट्विट; क्रिकेट जगताचे लागले लक्ष
आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स