हरभजन सिंग आणि एमएस धोनी यांच्यातील नातेसंबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. अनेकदा असे मानले गेले आहे की दोघांमध्ये काहीसा दुरावा आहे. हरभजनने काही वेळा अप्रत्यक्षरित्या धोनीवर टीका केली असून त्यामुळे माहीच्या चाहत्यांकडून त्याला टीकेला सामोरे जावे लागले आहे.
मात्र, अलीकडेच एका विवाहसोहळ्यात हरभजन आणि धोनी एकत्र संवाद साधताना दिसले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली – नेमके काय चर्चा झाली असेल? अखेर हरभजननेच याचा खुलासा केला. त्याने सांगितले की, त्याने धोनीला थेट विचारले , “आयपीएल 2025 साठी तयारी सुरू झाली का?
यंदाच्या आयपीएल हंगामाला 22 मार्चपासून सुरू होत आहे आणि त्यात एमएस धोनी देखील खेळताना दिसणार आहे. या हंगामातही अशी चर्चा आहे की हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो पण जोपर्यंत धोनी स्वतः असे म्हणत नाही तोपर्यंत निश्चितपणे काहीही सांगणे कठीण आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्जसोबतच्या कॅम्पमध्ये तयारी करण्यात व्यस्त आहे. येत्या हंगामात तो पुन्हा एकदा विकेटकीपर फलंदाज म्हणून खेळताना दिसेल.
हरभजन सिंगने सांगितले की तो धोनीला एका मित्राच्या मुलीच्या लग्नात भेटला. त्याने धोनीला विचारले, “या वयातही तू एवढा फिट कसा राहतोस? तुला हे सर्व कठीण वाटत नाही का?”
धोनी म्हणाला, “हो तसं कठीण आहे, पण मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. मी यात आनंद घेतो आणि फिट राहून खेळू इच्छितो. जोपर्यंत खेळाची इच्छा आहे, तोपर्यंत मी खेळत राहीन. वर्षभर क्रिकेट न खेळल्याने थोडं अवघड वाटतं, पण मी प्रयत्न करतो. मी काही तरी वेगळं करत असेन, म्हणूनच चांगलं प्रदर्शन करू शकतो.
हरभजनने पुढे सांगितले की, “धोनी गेल्या काही महिन्यांपासून सराव करत आहे. जितका जास्त सराव होईल, तितकी लय मिळते आणि मोठे फटके मारणं सोपं होतं. तो चेन्नईत दररोज 2-3 तास सराव करतो. मैदानात सगळ्यात आधी येतो आणि सगळ्यांच्या शेवटी जातो. या वयातही त्याची मेहनत कमी झालेली नाही, हेच त्याला खास बनवतं.”