fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारे ३ भारतीय गोलंदाज

Hat-tricks taken by a Indian bowlers in Test cricket

जसे कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणाऱ्या खेळाडूला मोठा सन्मान मिळतो तसाच तो हॅट्रिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजालाही मिळतो. आत्तापर्यंत कसोटीमध्ये ४५ वेळा हॅट्रिक घेण्यात आल्या आहेत. त्यातील ३ भारतीय गोलंदाजांनी घेतल्या आहेत. या लेखात त्याच ३ गोलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे.

भारताकडून कसोटीत हॅट्रिक घेणारे गोलंदाज – 

३. जसप्रीत बुमराह – विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१९ 

सध्याच्या भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेला जसप्रीत बुमराह कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज आहे. त्याने २०१९ ला सबिना पार्क, किंग्स्टन येथे वेस्ट इंडीज विरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळताना ही हॅट्रिक घेतली होती.

त्याने वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात ९ व्या षटकात हा कारनामा केला. त्याने या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्रावोला, तिसऱ्या चेंडूवर शामर्ह ब्रुक्स आणि चौथ्या चेंडूवर रोस्टन चेसला बाद करत कसोटी कारकिर्दीतील पहिली हॅट्रिक साजरी केली.

त्याने ब्रावोला केएल राहुलकरवी झेलबाद केले होते. तर शामर्ह ब्रुक्स आणि रोस्टन चेसला बुमराहने पायचीत केले.

त्या सामन्यात भारताने २५७ धावांनी विजय मिळवला होता. या विजयात बुमराहने हॅट्रिकसह एकूण ७ विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला होता.

२. इरफान पठाण – विरुद्ध पाकिस्तान, २००६ 

अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने भारताच्या अनेकदा अविस्मरणीय कामगिरी केली आहे. त्यातील एक म्हणजे त्याने २००६ ला कराची येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या कसोटी सामन्यात घेतलेली हॅट्रिक. त्यावेळी तो कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा भारताचा दुसराच गोलंदाज ठरला होता.

या कसोटी सामन्यात त्यावेळीचा कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पहिलेच षटक टाकण्यासाठी इरफानकडे चेंडू सोपवण्यात आला.

विशेष म्हणजे इरफानने पहिल्याच षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर विकेट्स घेत हॅट्रिक साजरी केली होती. त्याने चौथ्या चेंडूवर सलमान बटला बाद केले. सलमानने या चेंडूवर फटका मारायचा प्रयत्न केला असताना चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन द्रविडच्या हातात झेल गेला.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या युनुस खानला पाचव्या चेंडूवर इरफानने पायचीत केले. तर सहाव्या चेंडूवर मोहम्मद युसुफला इरफानने त्रिफळाचीत करत ही हॅट्रिक घेतली होती.

इरफानने पाकिस्तानची वरची फळी बाद केल्यानंतर मात्र पाकिस्तानने या सामन्यात चांगले पुनरागमन करत पुढे जाऊन हा सामना ३४१ धावांनी जिंकला.

१. हरभजन सिंग – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००१

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय आहे. त्याने हा कारनामा ऑस्ट्रेलिया विरुद्ध २००१ मध्ये कोलकताला झालेल्या कसोटीत केला होता. ती कसोटी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या फॉलोऑन नंतरच्या भागीदारीसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याच कसोटीच्या पहिल्या डावात हरभजनने हॅट्रिक घेतली होती.

त्याने या सामन्यात पहिल्या डावातील ७२ व्या षटकात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे  रिकी पॉन्टिंग, ऍडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांना सलग बाद केलं होतं. त्याने पान्टिंग आणि गिलख्रिस्टला पायचीत केले होते. तर शेन वॉर्नला झेलबाद केले होते. वॉर्नचा झेल सदागोपन रमेशने घेतला होता.

त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. तर भारताला पहिल्या डावात १७१ धावांवर रोखत फॉलोऑन दिला होता. त्यावेळी लक्ष्मणच्या २८१ आणि द्रविडच्या १८० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने दुसरा डाव ६५७ धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियाला ३८४ धावांचे आव्हान दिले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ २१२ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे भारताने १७१ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात हरभजनने एकूण १३ विकेट्स घेतल्या होत्या आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

ट्रेंडिंग लेख – 

कसोटीत क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारे ४ फलंदाज

पाकिस्तान संघाला वनडेत धु- धु धुणारे ३ भारतीय क्रिकेटर्स

ही दोस्ती तुटायची नाय! टीम इंडियातील जय- विरुच्या ५ जोड्या

You might also like