अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट (एमएलसी 2023) स्पर्धेत मंगळवारी (25 जुलै) अखेरचा साखळी सामना खेळला गेला. एमआय न्यूयॉर्क विरुद्ध सिएटल ऑरकास यांच्या दरम्यान झालेल्या या संघर्षपूर्ण सामन्यात सिएटल ऑरकास संघाने दोन गडी राखून विजय मिळवत गुणतालिकेतील अव्वल स्थान भक्कम केले शानदार शतक झळकावणारा सिएटल संघाचा हेन्रिक क्लासेन सामन्याचा मानकरी ठरला.
यापूर्वीच प्ले ऑफ्समधील चार संघ निश्चित झाल्याने या सामन्यात केवळ रोमांचक खेळाची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली. सिएटल संघाचा कर्णधार दसून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. एमआय न्यूयॉर्क संघासाठी निकोलस पुरण याने केवळ 34 चेंडूंमध्ये 68 धावांची वादळी खेळी केली. तर, कर्णधार कायरन पोलार्डने 18 चेंडूवर 34 धावांचा तडाखा दिला. इतर फलंदाजांच्या छोट्या छोट्या योगदानाचा जोरावर न्यूयॉर्क संघाने 194 पर्यंत मजल मारली.
या धावांचा पाठलाग करताना गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असलेल्या सिएटल संघाला पहिले दोन धक्के लवकर बसले. मात्र, नौमन अन्वर याने अर्धशतक झळकावून संघाला सामन्यात जीवंत ठेवले. त्यानंतर मैदानात हेन्रिक क्लासेन याचे वादळ घोंगावले. त्याने केवळ 44 चेंडूंमध्ये 110 धावांची नाबाद खेळी केली. त्याने 16 व्या षटकात राशिद खानवर आक्रमण करत तब्बल 26 धावा कुटल्या. त्यामुळे सिएटल संघाने 2 गडी राखून विजय मिळवला.
साखळी फेरीनंतर आता प्ले ऑफ्सचे चित्र स्पष्ट झाले असून सिएटल ऑरकास व टेक्सास सुपर पहिल्या क्वालिफायर सामन्यात 28 जुलै रोजी भिडतील. तर, वॉशिंग्टन फ्रीडम व एमआय न्यूयॉर्क यांच्या दरम्यान एलिमिनेटर सामना खेळला जाईल.
(Heinrich Klassen Hits First MLC Century For Seattle Orcas Against MI Newyork)