आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला अव्वल स्थान गमवावे लागले आहे. मागील काही काळापासून चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची पहिल्या स्थानावरुन थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ताज्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया संघ अव्वल तर न्यूझीलंड संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
परंतु यावेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे. तो म्हणजे सध्या जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असतानाही भारतीय संघाची कसोटी क्रमवारीत घसरण कशी काय होऊ शकते?
खरंतर भारतीय संघाची घसरण होण्यामागे आयसीसीच्या क्रमवारीचे गणित आहे. भारतीय संघ ऑक्टोबर २०१६नंतर पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीतील (Test Ranking) अव्वल क्रमांकावरून घसरला आहे.
भारतीय संघाने जेव्हा २०१६मध्ये अव्वल क्रमांकाचे स्थान पटकाविले होते, तेव्हा भारताने एकूण १२ कसोटी सामने जिंकले होते. तर केवळ एक सामना गमावला होता. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारताने ५ कसोटी मालिका खिशात घातल्या होत्या. यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा समावेश होता.
तर, ऑस्ट्रेलियाने मात्र त्यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावली होती. पण, नुकत्याच जाहीर झालेल्या कसोटी क्रमवारीत २०१६-१७ मधील कसोटी आकडेवारींना सामील करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, कसोटी कामगिरीच्यादृष्टीने भारताला २०१६-१७ हेच वर्ष शानदार गेले होते. यामुळेच भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होता.
नवीन कसोटी क्रमवारी यादी ही २०१७पासून ते आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांनुसार बनवण्यात आली आहे. त्यातही मे २०१९मध्ये खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांच्या १०० टक्के आणि मागील २ वर्षांतील कसोटी सामन्यांच्या ५० टक्के गुणांना गणले गेले आहे. त्यामुळे भारताला पहिले स्थान गमवावे लागले आहे.
आयसीसी दरवर्षी १ मे रोजी वार्षिक क्रमवारी जाहीर करत असते. यात नुकतेच झालेल्या प्रदर्शनासह, मागील ३ वर्षांच्या प्रदर्शनांचा समावेश केला जातो. नवीन कसोटी क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाचे ११६ गुण आहेत. तर, न्यूझीलंड आणि भारताला अनुक्रमे ११५ आणि ११४ गुण मिळाले आहेत. तिन्ही संघात केवळ २ गुणांचा फरक आहे. २००३पासून सुरु झालेल्या कसोटी क्रमवारीत असे दुसऱ्यांदाच झाले आहे की, पहिल्या ३ स्थानावर विराजमान असणाऱ्या संघांमध्ये एवढ्या कमी गुणांचा फरक आहे.
जानेवारी २०१६च्या कसोटी क्रमवारीतील पहिल्या ३ संघात फक्त १ गुणाचा फरक होता. त्यावेळी भारत (India) फक्त एका गुणाने ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) पुढे होता.
२०१७मध्ये भारताने एकूण ११ कसोटी सामन्यांपैकी ७ सामने जिंकले होते. तसेच एक सामना गमावला होता. तर, उर्वरित सामने अनिर्णित राहिले होते. त्याचबरोबर २०१८ हे वर्ष भारतासाठी खूप वाईट ठरले होते. यावेळी भारताने १४ कसोटी सामने खेळले होते. यातील ७ सामन्यात त्यांना विजय मिळाला. पण उर्वरित ७ सामन्यात भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला होता.
तर, २०१९मध्ये भारताने ८ कसोटी सामने खेळत, ७ सामने जिंकले होते आणि एक सामना अनिर्णित राहिला होता. फेब्रुवारी २०२०मध्ये भारत आणि न्यूझीलंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती आणि भारताला या मालिकेत ०-२ने पराभव स्विकारावा लागला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
–वनडेत सर्वाधिक सरासरी राखलेले १० खेळाडू, विराट दुसरा तर धोनी…
-टॉप ५: सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळलेले खेळाडू !
-जगातील ह्या ५ खेळाडूंच्या आहेत विचित्र क्रमांकाच्या जर्सी