टी20 विश्वचषकात शुक्रवारी (5 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका हा महत्त्वाचा सामना खेळला गेला. अ गटातील या अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीचे भविष्य अवलंबून होते. इंग्लंडने शानदार सांघिक कामगिरी करत श्रीलंकेला 4 गड्यांनी पराभूत करत उपांत्य फेरीत आपली जागा बनवली. इंग्लंडच्या विजयाने यजमान व गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडतात टी20 विश्वचषकातील एक इतिहास कायम राहिला.
ऑस्ट्रेलियाचे या विश्वचषकातील उपांत्य फेरीचे तिकीट श्रीलंकेच्या हाती होते. ऑस्ट्रेलियाने तीन विजय, एक पराभव व एका रद्द झालेल्या सामन्याच्या गुणासह 7 गुण कमावले होते. मात्र, त्यांचा रनरेट कमी होता. अशा परिस्थितीत केवळ इंग्लंडचा पराभव त्यांना उपांत्य फेरीत घेऊन जाऊ शकला असता. परंतु, इंग्लंडने श्रीलंकेला ही संधी न दिल्याने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मनसुबा पूर्ण होऊ शकला नाही.
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात डोकावल्यास दिसून येते की, विश्वचषकाचे यजमानपद भूषवणारा संघ कधीही स्पर्धेचे विजेतेपद पटकावू शकला नाही. आजवर केवळ श्रीलंका हा एकच संघ यजमान असताना अंतिम फेरीत पोहोचलेला. 2012 विश्वचषकात त्यांना वेस्ट इंडीजने पराभूत केले होते.
याशिवाय विजेतेपद जिंकणारा संघही आपले विजेतेपद राखण्यात आतापर्यंत यशस्वी ठरला नाही. 2007 मध्ये भारतीय संघाने पहिला विश्वचषक जिंकल्यानंतर अद्याप विश्वचषक जिंकू शकला नाही. तसेच विश्वचषक जिंकल्यानंतर कोणताही संघ पुढच्याच स्पर्धेत अंतिम फेरी देखील गाठण्यात यशस्वी झालेला नाही.