मुंबई – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगातील सर्वच क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. क्रीडा सामने होत नसल्याने खेळाडू आणि संघटनांची बैचेनी वाढत चालली आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधील क्रिकेटपटूच नव्हे तर हॉकी खेळाडू देखील एकमेकांवर आरोप करत आहेत.
पाकिस्तानचे माजी हॉकी कर्णधार हनीफ खान यांनी असा आरोप लावला की, 1983 साली हाँगकाँगवरून मायदेशी परतत असताना संघातील काही खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी किंमती सामानांची तस्करी केली होती. आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांच्या स्पर्धेनंतर संघातील साहित्यासोबत ‘कार स्पेयर पार्ट्स, वीसीआर, ग्लास फ्रेम’ सारख्या वस्तूंची तस्करी करून पाकिस्तानात आणण्यात आले होते. त्यावेळी या वस्तूंवर देशात प्रतिबंध घालण्यात आला होता.
या वस्तूंची किंमत जवळपास दीड कोटी रुपये होती. सुरक्षा समितीचे काही अधिकारी आणि सदस्य देखील या तस्करीमध्ये सामील होते. त्यामुळे हे प्रकरण नंतर दाबण्यात आले. हनीफ यांनी राष्ट्रीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि मॅनेजरची भूमिका बजावली होती.