भारतीय हॉकी संघाचा दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश यानं पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेतली आहे. त्याचं ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न होतं, मात्र ते पूर्ण झालं नाही. असं असलं तरी भारतीय संघ ऑलिम्पिकमधून रिकाम्या हातानं परतलेला नाही. टीम इंडियानं सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे.
भारताच्या या यशात गोलकीपर श्रीजेशचं मोठं योगदान होतं. आता त्याच्या या योगदानाची दखल घेत हॉकी इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे. पीआर श्रीजेशची 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात आली आहे. हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग यांनी याची घोषणा केली.
श्रीजेशनं आपल्या जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत 16 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. या जर्सीत त्यानं भारतीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये संस्मरणीय कामगिरी केली. त्याचीच दखल घेत हॉकी इंडियानं हा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. श्रीजेशसह त्याची 16 क्रमांकाची जर्सीही निवृत्त झाली आहे. आता ही जर्सी अन्य कोणताही खेळाडू परिधान करू शकणार नाही.
36 वर्षीय पीआर श्रीजेशनं हॉकीमधून निवृत्ती घेतली असली तरी तो हॉकीशी जोडलेला राहणार आहे. निवृत्ती घेतल्यानंतर तो भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहे. दोन दशकं भारताच्या मुख्य संघाची सेवा केल्यानंतर आता श्रीजेश देशाच्या भविष्यातील स्टार खेळाडूंना तयार करण्याचं काम करणार आहे.
जर आपण पीआर श्रीजेशच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्यानं आपल्या कारकिर्दीत भारतासाठी एकूण 335 सामने खेळले. या काळात त्यानं दोन ऑलिम्पिक पदकंही जिंकली. श्रीजेशनं 2006 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. त्याला 2008 च्या ज्युनियर आशिया चषकात सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार मिळाला होता. तर 2016 मध्ये त्यानं भारतीय हॉकी संघाचं नेतृत्वही केलं होतं.
हेही वाचा –
ठरलं! आयपीएल विजेता केकेआर स्टार्कसह या 5 खेळाडूंना रिटेन करणार
स्टीव्ह स्मिथचा आयपीएलमध्ये कमबॅक! मेगा लिलावासाठी नाव देणार
भारताच्या माजी क्रिकेटपटूला मिळाली मोठी जबाबदारी, या राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती