रणजी ट्रॉफी २०२२ चा दुसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात खेळला गेला. मुंबई संघाने हा सामना विक्रमी ७२५ धावांनी जिंकला. हा सामना संपल्यानंतर एक अशी खळबळजनक बातमी समोर आली, ज्यामुळे उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला यावर स्पष्टीकरण देण्यासाठी समोर यावे लागले.
एका वृत्तसंस्थेने अशी माहिती दिली होती की, कागदांवर लाखो करोडो रुपयांचा खर्च दाखवणारे उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन खेळाडूंना फक्त १०० रुपयांचा दैनिक भत्ता देत आहे. याच वृत्तानंतर क्रिकेट असोसिएशनला स्वतः पुढे येऊन यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.
वृत्तात अशीही माहिती दिली गेली आहे की, उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंच्या फक्त खाण्यापिण्यावर १.७४ कोटी खर्च दाखवला आहे. यामध्ये ४९ लाख ५८ हजार रुपये दैनिक भत्त्याच्या रूपात खर्च केले गेले आहेत. ३५ लाख रुपये केळी खरेदी करण्यासाठी, तर २२ लाख रुपये पाण्याच्या बाटल्यांवर खर्च झाल्याचे सांगितले गेले आहे. एवढेच नाही, क्रिकेट असोसिएशनमधील प्रशासकीय अनियमितपणाविषयी देखील टीका केली गेली आहे. खेळाडूंनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचे समजते.
या गंभीर आरोपांनंतर उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. पत्रकात सांगितेले गेले की, १०० रुपये दैनिक भत्त्याची माहिती चुकीची आहे. खेळाडूंना २०२१-२२ मध्ये १२५० आणि सपोर्ट स्टाफला १५०० रुपये भत्ता दिला गेला आहे. असोसिएशनने असेही सांगितले की, बायो बबलमुळे बीसीसीआयने हॉटेल बुक केले होते, त्यामुळे खाळाडू बाहेर जाऊ शकत नव्हते. अशात जेवण हॉटेलमधूनच मागवले गेले. याच कारणास्तव जेवणाचा खर्च त्यांच्या दैनिक भत्त्यातुन कापला गेला.
असोसिएशनने जेवणावर १.७४ कोटी रुपये खर्च झाल्याचे मान्य केले. पण त्यांनी असेही सांगितले की, या सर्व खर्चात ट्रायल, कॅम्प, टूर्नामेंट याव्यतिरिक्त बीसीसीआयने आयोजित केलेल्या विजय हजारे आणि २३ वर्षाखालील सामन्यांसह उत्तराखंड असोसिएशनद्वारे खेळवल्या गेलेल्या रणजी आणि १९ वर्षाखालील सामन्यांचा समावेश आहे. या सर्व आयोजनांमध्ये जेवणावर झालेला हा एकूण खर्च आहे. तसेच केवळ केळी खरेदी करण्यासाठी ३१ लाख खर्च झाल्याचे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
खेळाडूंना भत्ता देण्यासाठी उशीर का झाला?, याचाही असोसिएशनकडून खुलासा करण्यात आला. त्यांनी सांगितले की, भत्ता आणि बाकीच्या इनवाइस द्यावा लागतो. त्यानंतर बोर्डाकडून पैसे येतात. असोसिएशनचे असेही म्हणणे आले की, ते अजून नवे आहेत आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत की, ते खेळाडूंना ऍडवांसमध्ये पैसे देऊ शकतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कटकमध्ये भारत-दक्षिण आफ्रिेकेचे खेळाडू चाखणार ‘या’ पदार्थांची चव, पाहा मेन्यू
मुंबईसह ‘या’ ४ संघांनी मिळवलंय रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याचं तिकीट, कधी आणि कुठे होणार मॅच?