भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नई येथे सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दोन्ही दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत वर्चस्व गाजवले. कर्णधार जो रूटचे विक्रमी द्विशतक इंग्लंडचा डावाचे वैशिष्ट्य ठरले. रूटच्या या खेळीचे कौतुक इंग्लंड संघ थांबलेल्या हॉटेल व्यवस्थापनाने देखील अनोख्या पद्धतीने केले.
रूटने झळकावले द्विशतक
आपला १०० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत असलेल्या रूटने या सामन्यात दमदार द्विशतक ठोकले. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात फलंदाजीला आलेला रूट पहिल्या दिवसाखेर १२८ धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी देखील त्याने आपली खेळी तशाच पद्धतीने सुरू ठेवली. रविचंद्र अश्विनला पुढे सरसावत षटकार ठोकून त्याने आपले द्विशतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील पाचवे द्विशतक आहे. तसेच, शंभराव्या सामन्यात द्विशतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान त्याला मिळाला. वैयक्तिक २१८ धावसंख्येवर असताना शहाबाज नदीमने त्याला पायचीत केले.
हॉटेल व्यवस्थापनाने केले स्वागत
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, इंग्लंड संघ ज्यावेळी हॉटेलमध्ये दाखल झाला, तेव्हा हॉटेल व्यवस्थापनाने त्यांचे जंगी स्वागत केले. शानदार द्विशतक झळकावणाऱ्या रूटचे कौतुक म्हणून हॉटेल व्यवस्थापनाने खास केक मागविला होता. त्यांनी हा केक रूटला कापण्यास सांगितले. यादरम्यान हॉटेल कर्मचारी व इंग्लंड संघातील खेळाडूंनी टाळ्या वाजवत रूटचे अभिनंदन केले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Indian hospitality for @root66 – thank you ????????????
Day 2 Highlights: https://t.co/9G6YJG1Unx #INDvENG pic.twitter.com/5eHk1EzoF2
— England Cricket (@englandcricket) February 6, 2021
इंग्लंड संघाने गाजवले भारतावर वर्चस्व
इंग्लिश कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. युवा सलामीवीर रॉरी बर्न्स व डॉम सिबली त्यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. कर्णधार रूटने सिबलीसोबत चौथ्या गड्यासाठी२०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करून भारताला बॅकफूटवर ढकलले.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अष्टपैलू बेन स्टोक्सने वेगवान अर्धशतक झळकावत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ८ बाद ५५५ धावा बनविल्या आहेत. डॉम बेस नाबाद २८ तर लीच ६ धावांवर खेळत आहे. भारताकडून ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन आश्विन व शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा
राज्य निवडचाचणी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पैलवान अमोल मुंढे विजयी! आता गाजवणार पंजाबचं मैदान