-आदित्य गुंड
आपल्या आयुष्यात एकदा तरी विंबल्डनचा एखादा सामना पहावा असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र विंबल्डनची तिकिटे मिळवणे हे एक अतिशय अवघड काम आहे. अर्थात तुम्ही दर्दी टेनिसरसिक असाल तर एवढे तर नक्कीच करू शकता.
यंदा २ जुलैपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेची तिकिटे मिळवण्याकरता काय आहेत पर्याय?
१. लकी ड्रॉ –
तिकिटांसाठी लकी ड्रॉची पद्धत १९२४ पासून सुरु झाली. लकी ड्रॉमध्ये भाग घेतला म्हणजे तुम्हाला तिकिटे मिळतीलच असे नाही. शिवाय तुम्हाला हव्या त्या कोर्टवरील हव्या त्या सामन्याची तिकिटे मिळतीलच याची खात्री नसते. ते काम संगणकीय प्रक्रियेद्वारे होते. लकी ड्रॉ प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरता आपला अर्ज आदल्या वर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या अवधीमध्ये मागवावा लागतो. तो मागवण्याकरता अगोदरच पोस्टाचे तिकीट लावलेले एक पाकीट खालील पत्त्यावर पाठवावे लागते.
AELTC, PO Box 98, London, SW19 5AE.
हा अर्ज ऑल इंग्लंड क्लबच्या कार्यालयातून तुम्ही स्वतः जाऊनही घेऊ शकता. अर्ज भरून संयोजकांना पाठविल्यानंतर साधारण फेब्रुवारी महिन्यात लकी ड्रॉचे विजेते घोषित केले जातात. तिकिटाचे पैसे भरून विजेत्यांना आपली तिकिटे घेता येतात. विजेत्यांनी तिकिटे घेतली नाही तर ती तिकिटे पुन्हा लकी ड्रॉमध्ये ग्राह्य धरली जातात. अपंग व्यक्तीं आणि इंग्लंडबाहेरील प्रेक्षकांसाठी स्वतंत्र लकी ड्रॉ असतो. इंग्लंडबाहेर वास्तव्य असलेले प्रेक्षक ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आपला अर्ज भरू शकतात. अर्ज पाठवल्यानंतर तुम्हाला दोन इमेल येतात. पहिल्या इमेलद्वारे तुम्हीच हा अर्ज भरला आहे याची पडताळणी होते आणि दुसऱ्या इमेलद्वारे तुम्ही लकी ड्रॉ प्रक्रियेमध्ये सहभागी आहात याची खात्री होते.
यावर्षीसाठी हा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही. पुढील वर्षीच्या विंबल्डनसाठी मात्र तुम्ही हा पर्याय वापरू शकता.
२. रांग –
स्पर्धेच्या दिवशी तिकिटे विकणाऱ्या काही ठराविक स्पर्धांपैकी विंबल्डन एक आहे. यासाठी लोक एक दिवस अगोदरपासूनच तिकीट खिडकीबाहेर तंबू टाकून बसतात. अर्थात तिथेही रांग असतेच. रांगेत नंबर लावला की विंबल्डनच्या स्वयंसेवकांकडून तुम्हाला एक कार्ड दिले जाते. या कार्डवर तुमचा रांगेतील क्रमांक असतो. पहिल्या ५०० मध्ये जर नंबर मिळाला तर सेंटर कोर्ट अथवा कोर्ट नंबर १ वरच्या सामन्यांची तिकिटे मिळण्याची शक्यता जास्त असते. एकदा हे कार्ड मिळाले की तुम्ही आपला तंबू सोडून बाहेर फेरफटका मारू शकता. मात्र रात्री १० पर्यंत पुन्हा आपल्या तंबूमध्ये येणे बंधनकारक असते. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ लाच विंबल्डनचे स्वयंसेवक तुम्हाला झोपेतून उठवायला हजर असतात. आपला तंबू, इतर सामान गुंडाळून लॉकर्समध्ये ठेवावे लागते. या लॉकर्ससाठी देखील तुम्हाला ५ ते १० पौंड द्यावे लागतात.
एका व्यक्तीला एक या प्रमाणे तिकिटे विकली जातात. केवळ रोख पैसे देऊनच ही तिकिटे खरेदी करता येतात.
३. तिकिटमास्टर
या वेबसाइटवरून (ticketmaster.co.uk) सामन्यांच्या एक दिवस अगोदर ऑनलाईन तिकीटविक्री होते. आपल्याकडे मोबाईल विक्रीसाठी जसा फ्लॅश सेल होतो तशीच ही तिकिटे काही मिनिटांत संपून जातात.
४. बाहेर येणाऱ्या लोकांची तिकिटे –
या स्पर्धेमध्ये तिकिटांचे हस्तांतरण करणे नियमाला धरून आहे. बऱ्याचदा प्रेक्षक आपल्याला हवा असलेला सामना पाहून बाहेर जातात. बाहेर येणारे लोक आपले तिकीट पुन्हा विकू शकतात. त्यासाठी ग्राउंडजवळच तिकीटे पुन्हा विकण्यासाठी किऑस्क असतात. ही तिकिटे पदरात पाडून घेण्यासाठी तुमच्याकडे ग्राउंड पास असणे गरजेचे असते. हा पास साधारण २५ पौंडाला विकत घेता येतो.
५. हॉस्पिटॅलिटी पॅकेज –
तुमच्याकडे बक्कळ पैसा असेल तर या मार्गाचा वापर करून तुम्ही नक्की विंबल्डन बघू शकता. कीथ प्रोज आणि स्पोर्टसवर्ल्ड या कंपन्यांकडून तुम्ही ही पॅकेजेस विकत घेऊ शकता. ही पॅकेजेस ४०० पौंडांपासून ते अगदी ५००० पौंडांपर्यंत रकमेमध्ये उपलब्ध असतात.
६. हेन्मन हिल –
सेंटर कोर्टच्या उत्तरेकडे असणाऱ्या हेन्मन हिलवर बसूनही तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता. अर्थात त्यासाठी २५ पौंडाचे तिकीट तुम्हाला विकत घ्यावे लागते आणि सामना एका मोठ्या स्क्रीनवर पहावा लागतो.
७. काळाबाजार –
इतर सर्व स्पर्धांप्रमाणेच विंबल्डनमध्येही तिकिटांचा काळाबाजार होतो. काळ्याबाजारात घेतलेली तिकिटे तुम्हाला सामना पाहण्याचा आनंद देऊ शकतीलच याची खात्री मात्र नसते. प्रेक्षकांनी या मार्गाचा अवलंब करू नये अशी सूचना आयोजकांनी दिलेली असते.
तिकिटांची किंमत –
सेंटर कोर्टचे तिकीट साधारण ५५-६० पौंडांना असते. शनिवारी याच तिकीटाची किंमत १००-१२० पौंडांपर्यंत जाते. अंतिम सामन्याच्या तिकीटाची किंमत १८०-२०० पौंडापर्यंत जाऊ शकते.