इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेचा काल (१ सप्टेंबर) शेवटचा निकाल लागला. मॅनचेस्टर येथे पार पडलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला ५ धावांनी पराभूत केले आणि मालिका १-१च्या बरोबरीवर संपली.
इमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मैदानावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानने २० षटकात ४ विकेट्स गमावत १९० धावा केल्या. तर, इंग्लंड पाकिस्तानच्या १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात ८ विकेट्स गमावत १८५ धावाच करु शकला. अशाप्रकारे पाकिस्तानने विजयासह या टी२० मालिकेचा शेवट केला.
या टी२० सामन्यात पाकिस्तानच्या मिळालेल्या विजयात अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. वयाच्या ३९व्या वर्षीदेखील हाफिज ज्याप्रकारे टी२० क्रिकेटमध्ये प्रदर्शन करत आहे, ते उल्लेखनीय आहे. इंग्लंडविरुद्धचा पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
मात्र, दूसऱ्या टी२० सामन्यात हाफिजने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने केवळ ३६ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार मारत ६९ धावा केल्या होत्या. तर, तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यात त्याने ५२ चेंडूत नाबाद ८६ धावांची अफलातून खेळी केली. यात त्याच्या ४ चौकारांचा आणि ६ षटकारांचा समावेश होता. तिसऱ्या टी२० सामन्यातील खेळीमुळे हाफिज सामनावीर ठरला. तसेच दूसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातील त्याच्या दमदार खेळीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कारदेखील देण्यात आला.
अशाप्रकारे हाफिजने ३९ वर्षे ३२१ दिवसांच्या वयात आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी केली आहे. टी२० क्रिकेटच्या इतिहासात केवळ सनथ जयसूर्या हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने हाफीजपेक्षाही जास्त वय असताना टी२० सामन्याच्या एका डावात ७५ धावांपेक्षा जास्त धावांची खेळी करण्याचा विक्रम केला आहे. जयसूर्याने ३९ वर्षे ३४५ दिवसांचे वय असताना २००९ सालच्या टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ८१ धावांची खेळी केली होती. Mohammed Hafeez Registered His Highest Score In T20I At The Age Of 39 Years And 321 Days
एवढेच नव्हे तर, हाफिजने ३८व्या वर्षानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
याबरोबरच इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान हाफिजने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये २००० धावा आणि ५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये २००० धावा आणि ५० विकेट्स घेणारा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनच्या आयपीएलमधील विकेटने ‘त्या’ भारतीय गोलंदाजाला मिळाले होते अतिशय महागडे गिफ्ट
बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच पण कौतूकाची थापही जरूर द्या!
ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी, पॉइंट्स टेबलमध्ये या क्रमांकावर असणार मुंबई इंडियन्स
ट्रेंडिंग लेख –
असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे
आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा
आयपीएलमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना मिळाले क्षमतेपेक्षाही अधिक पैसे, पण कामगिरीच्या बाबतीत मात्र…