भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटूंना संधी देताना दिसत आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून बऱ्याचशा नवोदित शिलेदारांची भारतीय संघात पदार्पण करण्याची स्वप्ने पूर्ण झाली आहेत. अनेकांनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करत संघातील आपले स्थानही पक्के केले आहे. यामुळे काही कारणास्तव संघाबाहेर झालेल्या अनुभवी खेळाडूंना पुनरागमनाची संधी मिळत नसल्याचे दिसत आहे. यातील एक नाव म्हणजे, २९ वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने लक्षणीय प्रदर्शन करुनही उनाडकट भारतीय संघातील त्याचे स्थान परत मिळवू शकलेला नाही. २०२०-२१ मधील भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा किंवा इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर आपल्याला संधी मिळेल अशी त्याला आस होती. परंतु पुन्हा एकदा आपल्यावर दुर्लक्ष केले गेल्याने त्याने निराशा व्यक्त केली आहे.
उनाडकट म्हणाला की, “मी आता माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. मी मागील काही काळात शानदार प्रदर्शन केले आहे. त्यामुळे मला अपेक्षा होती की, आता तरी मला भारतीय संघाकडून बोलावण येईल. परंतु तसे झाले नाही. मला मान्य आहे, बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्याने माझ्या संधी कमी झाल्या. याचा परिणाम असा झाला आहे की, प्रत्येक क्रिकेट मालिकेसाठी बोर्डाने एक मोठा पूल तयार केला आहे. यामुळे प्रत्येक खेळाडूसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. तरीही माझी निवड होणे निश्चितपणे निराशादायी होते.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव या अनुभवी गोलंदाजांना दुखापती झाल्या होत्या. त्यांच्याजागी शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी नटरजामन या युवा गोलंदाजांना संधी मिळाल्या. परंतु प्रथम श्रेणी क्रिकेटचा स्टार क्रिकेटपटू उनाडकटला संधी दिली गेली नाही.
याबाबत बोलताना उनाडकट म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघातील बरेचसे गोलंदाज दुखापतग्रस्त झाले होते. तरीही माझा विचार केला गेला नाही, हे पाहून खूप दु:ख झाले. सुरुवातीला संघातील प्रत्येक खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होता त्यामुळे हरकत नव्हती. परंतु पुढे संधी निर्माण झाल्या होत्या. अशावेळी मी संघात जागा मिळण्याचा हक्कदार होतो, असे मला वाटते.”
उनाडकटने २०१९-२० रणजी ट्रॉफी हंगामात शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले होते. त्याने या पूर्ण हंगामात तब्बल ६७ विकेट्स घेतल्या होत्या. या रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका हंगामात कोणत्या वेगवान गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स ठरल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी जिंकली होती. एवढेच नव्हे तर, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची आकेडावारीही उल्लेखनीय राहिली आहे. त्याने आतापर्यंत ८९ प्रथम श्रेणी सामने खेळताना त्याने ३२७ विकेट्स घेतल्या आहेत.
उनाडकटने त्याचा शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०१६ मध्ये खेळला होता. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध त्याने कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याचा हा कसोटी पदार्पणाचा सामनाच त्याचा शेवटचा कसोटी सामना ठरला. केवळ कसोटी क्रिकेट नव्हे तर, त्याला मर्यादित षटकांच्या संघातही पुरेसी संधी मिळालेली नाही. २०१८ साली त्याने शेवटचा टी२० सामना खेळला होता तर २०१३ साली अखेरचा वनडे सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
टेस्ट चॅम्पियनशीप: ‘हा’ युवा गोलंदाज ठरेल बुमराहचा सर्वोत्कृष्ट पर्याय, माजी दिग्गजाने सांगितले नाव
रोहित आणि विराट यांच्यासोबत चर्चा करताना मिळतात ‘हे’ सल्ले, शुभमन गिलचा खुलासा