इंग्लंडचे महान क्रिकेटपटू इयान बॉथम यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. ही रचलेली कथा नसून सत्य घटना आहे. जर त्यांच्याकडून एका सेकंदाचा जरी उशीर झाला असता, तर मगर किंवा शार्कनं त्यांच्या शरीराचे लचके पाडले असते!
हो तुम्ही जे वाचलं, ते अगदी खरं आहे. इयान बॉथम आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मर्व ह्यूज एकत्र मासेमारीला गेले होते. या दरम्यान त्यांच्यासोबत ही घटना घडली. बॉथम अचानक नदीत कोसळले, यानंतर त्यांच्यासोबत जे झालं, ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत.
ही घटना उत्तर ऑस्ट्रेलियातील मोयल नदी किनारी घडली. बॉथम आणि ह्यूज चार दिवसांच्या मासेमारी टूरला गेले होते. या दरम्यान त्यांची चप्पल होडीला बांधलेल्या दोरीत अडकली, ज्यामुळे ते नदीत कोसळले. नदीत पडल्यामुळे त्यांच्या शरीरावर बराच मार लागला. मात्र यापेक्षाही भयानक म्हणजे, ते जिवघेण्या मगर आणि शार्कच्या जाळ्यात अडकण्यापासून थोडक्यात वाचले.
इयान बॉथम यांनी या घटनेचं वर्णन करताना सांगितलं की, ते मगरीच्या जबड्यात येण्यापासून थोडक्यात वाचले. ते म्हणाले, “मी पाण्यात जितक्या वेगानं पडलो, तितक्याच वेगानं बाहेर आलो. कदाचित काही मगरी माझ्यावर लक्ष ठेवून होत्या. मात्र पाण्यात काय घडलं हे मी पाहू शकलो नाही”. इंग्लंडच्या या दिग्गज क्रिकेटपटूनं सांगितलं की, हे सर्वकाही खूपच वेगात झालं. मात्र चांगली बाब म्हणजे ते आता सुरक्षित आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 2 लाख मगरी आहेत. विशेष करून, देशाच्या उत्तर भागात त्यांची संख्या सर्वाधिक आहे. मोयल नदी मगरींसाठी प्रसिद्ध आहे. येथे एक चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात जवळपास 5 मगरी पाहायला मिळतात. यामुळे बॉथम सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर आले, हे चमत्कारापेक्षा कमी नाही.
इयान बॉथम यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्यांनी इंग्लंडसाठी 102 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी 5,200 धावा केल्या आणि 383 विकेट घेतल्या. त्यांनी कसोटीत 14 शतकं आणि 22 अर्धशतकं लगावली आहेत. याशिवाय त्यांच्या नावे 116 एकदिवसीय सामन्यांमध्ये 145 विकेट आणि 2,113 धावा आहेत.
हेही वाचा –
केएल राहुल आणि अथिया शेट्टीचं प्रेम कसं जमलं? पहिली भेट कुठे झाली होती? खूपच रंजक आहे लव्ह स्टोरी!
ऑस्ट्रेलियात भारतीय संघावर अन्याय, अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमवावा लागेल?
गुड न्यूज! स्टार भारतीय फलंदाजाच्या घरी लवकरच पाळणा हलणार, बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी आनंदाची बातमी