भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी(27 फेब्रुवारी) दोन सामन्याची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशा फरकाने विजय मिळवला आहे. या मालिकेनंतर आज(28 फेब्रुवारी) आयसीसीने टी20 क्रमवारी जाहिर केली आहे.
या फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये भारताच्या फक्त केएल राहुलचा समावेश आहे. तसेच या क्रमवारीत आफगाणिस्तानचा फलंदाज हजरतूल्लाह झझईने 31 क्रमांकांची मोठी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम 7 वे स्थान मिळवले आहे.
राहुलने भारतीय संघात यशस्वी पुनरागमन करताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यात 50 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 47 धावा केल्या होत्या. कॉफी विथ करन प्रकरणानंतर हे यशस्वी पुनरागमन करताना केलेल्या या चांगल्या कामगिरीमुळे त्याने क्रमवारीत 4 स्थानांची प्रगती करत 726 गुणांसह 6 वे स्थान मिळवले आहे.
तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली 2 स्थानांनी पुढे जात 17 व्या क्रमांकावर आला आहे. तर एमएस धोनीनेही सात स्थानांची झेप घेत 56 वे स्थान मिळवले आहे.
त्याचबरोबर गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहने 12 क्रमांकाची मोठी प्रगती करत 15 वे स्थान मिळवले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यात 16 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्याबरोबरच कृणाल पंड्यानेही 18 स्थानांची प्रगती करत 43 वे स्थान मिळवले आहे.
मात्र भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तो दुसऱ्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर आला आहे.
अन्य संघांच्या क्रिकेटपटूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने भारताविरुद्ध दोन टी20 सामन्यात अनुक्रमे केलेल्या 56 आणि 113 धावांच्या खेळीमुळे 2 स्थांनांची प्रगती करत तिसरे स्थान मिळवले आहे.
हजरतूल्लाहने आयर्लंड विरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 204 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने 31 स्थानांची प्रगती करत 7 वे स्थान मिळवले आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाच्या डॉर्सी शॉर्टनेही 8 क्रमांकाची झेप घेत फलंदाजांमध्ये 8 वे स्थान मिळवले आहे. तर गोलंदाजांमध्ये नॅथन कुल्टर नाईलने भारताविरुद्ध दोन सामन्यात 4 विकेट्स घेतल्याने 4 क्रमांकाची प्रगती करत 45 वे स्थान मिळवले आहे.
संघ क्रमवारीत भारताने त्यांचे दुसरे स्थान पुन्हा मिळवले आहे तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला मागे टाकत तिसरे स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 2 गुणांचा फरक राहिला आहे. भारताचे 122 गुण आहेत आणि ऑस्ट्रेलियाचे 120 गुण आहेत.
या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर 135 गुणांसह पाकिस्तान आहे. तसेच दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि इंग्लंड पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान आठव्या आणि आयर्लंड 17 व्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–‘आपल्याच कॅप्टनला स्लेज करणार?’ कोहलीचा बुमराहला प्रश्न, पहा व्हिडिओ
–एमएस धोनीने स्विकारलं रिषभ पंतचे ते चॅलेंज, पहा व्हिडिओ
–टॉप १०: टी२० मालिका पराभूत झाली पण भारतीय खेळाडूंनी केले हे खास विक्रम