बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह ग्रेग बार्कले यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे अध्यक्ष बनू शकतात. बार्कले यांनी आयसीसी संचालकांना सांगितलं की, त्यांचा तिसऱ्यांदा या पदासाठी निवडणूक लढवण्याचा कोणताही इरादा नाही. जय शाह निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
शाह यांना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डांचा पाठिंबा आहे. त्यांच्याकडे आयसीसी अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी पुरेसं पाठबळ आहे. बार्कले यांचा सध्याचा कार्यकाळ नोव्हेंबरच्या अखेरीस संपेल, ज्यानंतर ते पदावरून पायउतार होतील. बार्कले यांची नोव्हेंबर 2020 मध्ये आयसीसीचे स्वतंत्र चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर 2022 मध्ये त्यांची पुन्हा निवड झाली होती.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 27 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे लागतील. जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर निवडणुका होतील आणि नवीन अध्यक्षांचा कार्यकाळ 1 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल. आयसीसीच्या नियमांनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 16 मतं असतात आणि निवडून येण्यासाठी 9 मतांचं बहुमत (51 टक्के) आवश्यक असतं.
सध्या शाह यांच्याकडे बीसीसीआयचे सचिव म्हणून आणखी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्यानंतर त्यांना ऑक्टोबर 2025 पासून 3 वर्षांच्या अनिवार्य ‘कुलिंग ऑफ’ कालावधीवर जावं लागेल. सुप्रीम कोर्टानं बनवलेल्या बीसीसीआयच्या घटनेनुसार, एखादा अधिकारी सहा वर्षांसाठी या पदावर राहू शकतो. त्यानंतर त्याला तीन वर्षांच्या ‘कूलिंग ऑफ पिरियड’वर जावं लागेल. एखादी व्यक्ती एकूण 18 वर्ष या पदावर राहू शकते, ज्यामध्ये राज्य संघटनेत 9 वर्षे आणि बीसीसीसीआयमधील 9 वर्षांचा समावेश आहे. जर शाह यांनी सचिवपदचं एक वर्ष शिल्लक असताना आयसीसीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, तर बीसीसीआयमध्ये त्यांच्याकडे चार वर्ष शिल्लक राहतील.
जय शाह वयाच्या 35व्या वर्षी आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष बनू शकतात. त्यांच्या आधी भारताचे जगमोहन दालमिया (1997 ते 2000), शरद पवार (2010-2012), एन. श्रीनिवासन (2014-2015) आणि शशांक मनोहर (2015 -2020) आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत.
हेही वाचा –
धोनी नंबर 2…ॲडम गिलख्रिस्टनं सांगितली जगातील 3 महान यष्टीरक्षकांची नावं; पहिला क्रमांक कोणाचा?
जय शाह बनणार आयसीसीचे नवे अध्यक्ष? लवकरच नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता
टी20 पाठोपाठ आता कसोटीतूनही राहुलचा पत्ता कट होणार? सोपं गणित समजून घ्या