श्रीलंकेचा 31 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. डिकवेलावर यावर्षी ऑगस्टमध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. आता त्याच्यावरची ही बंदी उठवण्यात आली आहे.
निरोशन डिकवेलाचं हे प्रकरण लंका प्रीमियर लीग 2024 दरम्यान समोर आलं होतं. स्पर्धेदरम्यान तो डोपिंग चाचणीत कथितरित्या दोषी आढळला होता. यानंतर त्याच्यावर तीन वर्षांसाठी क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. डिकवेलावर श्रीलंका अँटी डोपिंग एजन्सीनं ही कारवाई केली होती.
डिकवेलानं या बंदीच्या विरोधात अपील केलं आणि प्रकरणाशी संबंधित काही पुरावे सादर केले. यावरून असं दिसून आलं की त्यानं स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रतिबंधित पदार्थांचं सेवन केलेलं नाही. त्यानं सेवन केलेले पदार्थ कामगिरी वाढवण्यासाठी नव्हते याची पुष्टी झाली. यानंतर आता डिकवेलावरील बंदी तात्काळ उठवण्यात आली आहे. यासह त्याला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये पुन्हा खेळण्याची परवानगी मिळाली.
या यष्टिरक्षक फलंदाजानं मार्च 2023 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तो श्रीलंकेच्या प्लेइंग 11 चा भाग होता. या कसोटीनंतर त्याला वगळण्यात आलं कारण त्यानं सामन्यात फक्त 7 धावा केल्या होत्या.
डिकवेलानं नोव्हेंबर 2014 मध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं आपल्या कारकिर्दीत श्रीलंकेसाठी आतापर्यंत 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 31.45 च्या सरासरीनं 1604 धावा केल्या. त्याच्या नावे या फॉरमॅटमध्ये दोन शतकं आणि 9 अर्धशतकं आहेत. याशिवाय डिकवेलानं 54 कसोटी सामन्यात 2757 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याच्या बॅटमधून 22 अर्धशतकी खेळी निघाल्या. त्याचबरोबर त्यानं 28 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 480 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च? सोशल मीडियावरील दाव्यामागची कहाणी जाणून घ्या
‘सिक्सर किंग’ युवराज सिंगची एकूण संपत्ती किती? निवृत्तीनंतरही युवी कुठून कमावतो कोट्यवधी रुपये?
गाबा कसोटीसाठी भारतीय संघात होणार अनेक बदल, या दोन खेळाडूंचं बाहेर होणं निश्चित