आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या वर्षीपासून ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार प्रदान करायला सुरुवात केली. दर महिन्याला त्या त्या महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणार्या एका पुरुष आणि एका महिला क्रिकेटपटूला हा पुरस्कार दिला जातो. त्याच अंतर्गत नुकतेच मे महिन्याचे पुरस्कार आयसीसीने जाहीर केले आहेत. यात बांग्लादेशचा अनुभवी खेळाडू मुशफिकुर रहीमने पुरुष क्रिकेटपटूंमध्ये हा मान पटकावला आहे. तर महिला क्रिकेटपटूंमध्ये स्कॉटलंडच्या कॅथरिन ब्राइसने हा मान पटकावला आहे.
‘असे’ होते मुशफिकुर रहीमचे प्रदर्शन
मे महिन्यात मुशफिकुर रहीमने दमदार प्रदर्शन केले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध एक कसोटी सामना आणि तीन वनडे सामने खेळले. यातील दुसर्या वनडे सामन्यात त्याने १२५ धावांची शतकी खेळी करत बांग्लादेशच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. एकूण तीन वनडे सामन्यात २३७ धावा करत तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. याच कामगिरीमुळे पाकिस्तानचा हसन अली आणि श्रीलंकेच्या प्रविण जयविक्रमाला मागे टाकत मुशफिकुरने हा पुरस्कार पटकावला.
व्हीव्हीएस लक्ष्मणने केले कौतुक
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मुशफिकुरला मिळाल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आयसीसीच्या मतदान समितीचा सदस्य व्हीव्हीएस लक्ष्मणने त्याचे भरभरून कौतुक केले. तो म्हणाला, “आंतरराष्ट्रीय पातळीवर १५ वर्षे खेळत असून देखील मुशफिकुरची धावांची भूक अजून कमी झाली नाही. त्याच्या या पुरस्काराचे महत्व अजूनच वाढते. कारण बांग्लादेशने श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदाच मालिका विजय मिळवला आहे.”
महिला क्रिकेटपटूंमध्ये स्कॉटलंडला मान
महिला क्रिकेटपटूंमध्ये स्कॉटलंडच्या कॅथरिन ब्राइसने आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा मान मिळवला. कॅथरिन ब्राइस ही स्कॉटलंडची महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंपैकी पहिली खेळाडू ठरली, जिने आयसीसी क्रमवारीत अव्वल दहा स्थानांमध्ये झेप घेतली. तिने मे महिन्यात आयर्लंडविरुद्ध ४ टी२० सामन्यात ९६ धावा केल्या. त्यासह पाच विकेट देखील पटकावल्या. याच कामगिरीचे फळ म्हणून तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
वॉर्नर कुटुंबाचा पंजाबी तडका! सोशल मीडियावर व्हायरल होतोय भन्नाट डान्सचा व्हिडिओ
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतकी’ रक्कम, आयसीसीने केली घोषणा